नाशिकमधील मुकणे पाणीपुरवठा योजनेच्या कामाला जलसाठ्याचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 07:36 PM2018-01-22T19:36:04+5:302018-01-22T19:38:02+5:30
आयुक्तांकडून पाहणी : आवर्तन सोडण्यासाठी पाठपुरावा
नाशिक - महापालिकेमार्फत जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून आतापर्यंत ६९ टक्के काम झाले आहे. परंतु, धरण जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद पडलेली आहेत. धरणात सुमारे ९५ टक्के जलसाठा असल्याने कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोमवारी (दि.२२) योजनेच्या कामांची पाहणी करून धरणातील पाण्याचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.
आयुक्तांनी मुकणे धरण जलाशय येथील हेडवर्क्सच्या कामांची पाहाणी केली.मागील वर्षी झालेल्या पावसामुळे मुकणे धरणात सुमारे ९५ टक्के इतका जलसाठा झालेला असून मागील १० वर्षात धरण एवढ्या मोठ्या प्रमाणात भरले आहे. धरणातील जलसाठ्यामुळे जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद झालेली आहेत. सद्यस्थितीत हेडवर्क्सचे काम ५८ टक्के इतकेच झालेले आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय हेडवर्क्सची उर्वरित कामे सुरु करता येणार नाही आणि कामाची मुदत जुलै २०१८ पर्यंत. मागील दोन वर्षात हेडवर्क्सचे काम करण्यास अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी मिळालेला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी लवकरात लवकर कमी करून मिळण्यासाठी आवर्तन लवकर सोडण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्याची सूचना आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांना केली. त्यानंतर, आयुक्तांनी मुंबई महामार्गालगत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामाचीही पाहणी केली. राजूरफाटा, वाडीव-हे, रायगडनगर, जैन मंदिर या भागात सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. आतापर्यंत १६ कि.मी.पैकी ११ कि.मी. काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. सदर पाईपलाइन ही मुकणे धरणातील हेडवर्क्सपासून ते पाथर्डी जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत टाकण्यात येत आहे. उर्वरित कामेही तातडीने मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
जलशुद्धिकरण केंद्राची पाहणी
मुकणे धरण व पाईपलाईनच्या कामाची पाहाणी झाल्यानंतर आयुक्तांनी विल्होळी जकात नाका येथे सुरु असलेल्या जलशुध्दीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. जलशुध्दीकरण केंद्राच्या कामाची प्रगती सद्यस्थितीत ७० टक्के झालेली आहे. सदर कामही तातडीने पूर्ण करण्याची सूचना आयुक्तांनी संबंधितांना केली.