पाडळदेला वीस दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:12 AM2021-05-24T04:12:46+5:302021-05-24T04:12:46+5:30

राजेंद्र मंडळ पाडळदे : येथे गेल्या वीस दिवसांपासून नळांना पाणी नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून एकीकडे कोरोनाचा ...

Water supply to Padalde has been cut off for twenty days | पाडळदेला वीस दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित

पाडळदेला वीस दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित

Next

राजेंद्र मंडळ

पाडळदे : येथे गेल्या वीस दिवसांपासून नळांना पाणी नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून एकीकडे कोरोनाचा सामना करताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. टँकरने पाणी आणून विहिरीत टाकावे लागत असून, त्या विहिरीतूनही सर्वांना पाणी मिळत नसल्याने, वृद्ध आणि महिला वर्गाला पाण्यावाचून हाल सहन करावे लागत आहे. संबंधितांनी त्वरित गावाचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

पाडळदे परिसरात जलप्राधिकरणामार्फत सव्वीस गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरविले जाते. जवळजवळ वीस दिवसांपासून पाडळदे गावासह परिसराला पाणीपुरवठा झालेला नसल्याने येथील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, तर दुसरीकडे कडक उन्हाळा अशा दुहेरी संकटात सापडल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. माळमाथा परिसर असल्यामुळे येथील नागरिकांना शेतीवर अवलंबून राहावे लागते. उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नसून लोकप्रतिनिधी या भागाकडे फिरकत ही नाही, त्यामुळे मतदार ग्रामस्थांत नाराजी आहे. राज्याच्या कृषिमंत्री दादा भुसे यांचेही गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. नेहमीच या भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत असते. त्यातच पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. या भागाकडे कोणी लक्ष देत नाही. परिसरातील सर्व नागरिक प्रामाणिकपणे हजारो रुपये पाणीपट्टी दरवर्षाला भरत असूनही वेळेवर पाणी सोडले जात नाही. शहरातील नागरिकांना जास्त सुविधा दिल्या जातात. त्या ग्रामीण भागात मिळत नाही. ग्रामीण भागातील लोकांना पिण्याजोगे योग्य पाणी फक्त वेळेवर मिळावे, एवढीच अपेक्षा आहे, परंतु येत्या गेल्या वीस दिवसांपासून पाणी न आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ग्रामस्थांची लहान मुलांना अनवाणी घेऊन पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. परिसरातील नागरिक आम्ही माणसं नाहीत का, शहरातीलच नागरिकच माणसं आहेत का, असा सवाल करीत आहेत. शहरात सर्वच नागरी सुविधा पुरविल्या जातात आणि ग्रामीण भागातील लोकांना पुरवत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. एवढ्या एक-दोन दिवसांत पाणीपुरवठा न झाल्यास ग्रामस्थ रास्ता रोको व उपोषण करण्याच्या मन:स्थितीत आहेत.

पिण्यासाठी शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टँकरने पाणीपुरवठा करूनही लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही, तसेच शौचाला उघड्यावर जावे लागत असल्याने साथीचे आजार अधिक पसरण्याची भीती बाळगली जात असून, लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी या भागाकडे लक्ष द्यावे. संबंधितांनी त्वरित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अशी मागणी भिका मंडळ, धीरज मंडळ, नाना पगार, प्रवीण जिंजर, सतीश कुलकर्णी, विठ्ठल सैंदाणे, ज्ञानेश्वर सोनवणे सागर फंगाळ, योगेश मंडळ, तुळशीराम ठाकरे यांनी केली आहे.

फोटो - २३ मालेगाव १

पाडळदे येथे विहिरीत टँकरने आणून टाकलेले पाणी घेण्यासाठी उडालेली झुंबड.

Attachments area

===Photopath===

230521\23nsk_1_23052021_13.jpg

===Caption===

पाडळदे येथे विहिरीत टँकरने आणून टाकलेले पाणी घेण्यासाठी उडालेली झुंबड.

Web Title: Water supply to Padalde has been cut off for twenty days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.