भाताच्या रोपांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:41 PM2021-07-08T16:41:54+5:302021-07-08T16:41:54+5:30
नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर व धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे भाताची रोपे पिवळी पडू लागल्याने त्यांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर व धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे भाताची रोपे पिवळी पडू लागल्याने त्यांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
पाऊस नसल्याने यंदाचे वर्ष कसे जाणार, याची चिंता आता तालुक्यातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यावर्षी 'ना पाऊस ना धान्य' अशी काहीशी स्थिती निर्माण झाली असून, भाताची रोपे पिवळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील नांदूरवैद्य येथील शेतकऱ्यांवर भाताच्या रोपांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
भारताची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात महिनाभरापासून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीन, भात, भुईमूग, नागली, वरी, खुरासनी आदी पिके संकटात सापडली आहेत. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील ऐन बहरात येणारी व आलेली भातशेती संकटात सापडली असून, सध्या भाताच्या रोपांची वाढ खुंटली आहे. भातासह इतर रोपांना याकाळात पाण्याची अत्यंत आवश्यकता असते.
मात्र, पाऊसच गायब झाल्यामुळे भाताची रोपे पिवळी पडत असल्यामुळे भातशेती संकटात सापडली आहे. बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस होण्याची प्रतीक्षा लागली आहे. भाताच्या रोपांचे नुकसान होऊ नये म्हणून नांदूरवैद्य येथील शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करत रोपांना जीवनदान दिले आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील धरणांनीदेखील तळ गाठला असल्याने धरणांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
दरम्यान, पावसाअभावी तालुक्यात काही भागात भाताची रोपे करपू लागली असून, याचा परिणाम पुढील काळात होणाऱ्या उत्पादन क्षमतेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला सरासरी ९७ टक्के पर्जन्यमान होईल, असा अंदाज वर्तवला होता. या आनंद वार्तामुळे बळीराजा सुखावला होता. त्यानुसार जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली.
मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील चार ते पाच तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये अद्याप दमदार पाऊस पडलेला नाही. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्याची सद्यस्थिती.
धरण. दशलक्ष घनफूट. टक्के
दारणा ३२४८ ४५.४३
भावली धरण - ६२५ ४३.५८
मुकणे धरण - १७७३ २४.९९
कडवा धरण - २३६ १३.९८
भाम धरण - १७८ . ७.२४
नांदूरवैद्य येथे भाताची रोपे पिवळी पडत असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करतांना शेतकरी. (०८ नांदूरवैद्य १)