सहा दिवसाआड पाणीपुरवठा
By admin | Published: December 24, 2015 10:45 PM2015-12-24T22:45:58+5:302015-12-24T23:33:30+5:30
येवला : पालखेड पाणी आवर्तन येईपर्यंत नियोजन करण्याची गरज
येवला : पाणीटंचाई आणि पालखेड पाणी आवर्तनाची शाश्वती नसल्याने येवला शहराचा पाणीपुरवठा सहा दिवसाआड करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे ५ जानेवारीपर्यंत शहराला पाणी पुरणार आहे.
५० द.ल.घ.फूट पाणी साठवण क्षमता असलेल्या येवला शहर पाणीपुरवठा तलावात मंगळवारअखेर ५ द.ल.घ.फू. पाणीसाठा शिल्लक आहे. २० नोव्हेंबरपूर्वी शहरवासीयांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळण्यास उशीर होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, उपनगराध्यक्ष पंकज पारेख, पाणीपुरवठा सभापती पद्माताई शिंदे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी वेळोवेळी तातडीच्या सभेचे आयोजन करून २० नोव्हेंबरपासून शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सध्या शिल्लक पाणीसाठा जानेवारीअखेर पुरवण्यासाठी पाच दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला होता.
दरम्यान, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, उपनगराध्यक्ष पंकज पारेख, पाणीपुरवठा सभापती पद्मा शिंदे व मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, पाणीपुरवठाप्रमुख जनार्दन फुलारी, बाळासाहेब शिंदे, अर्जुन शिंदे, अण्णा शिंदे यांनी मंगळवारी साठवण तलावाला भेट दिली. केवळ ५ द.ल.घ.फूट पाणीसाठा शिल्लक असल्याने २३ डिसेंबरपासून शहराला ६ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. शिवाय आवर्तनाची परिस्थिती पाहून १ जानेवारीनंतर पाणीकपात करण्याचे संकेत पालिकेने दिले आहेत. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा ५ द.ल.घ.फूट असला तरी त्यातील सुमारे दीड द.ल.घ.फूट पाणीसाठा हा कामी येणारा नाही.
त्यामुळे पालखेड पाणी आवर्तन येईपर्यंत शिल्लक साडेतीन द.ल.घ.फूट पाण्यावर शहराची गरज भागवावी लागणार आहे. पालिकेने उपाययोजनेचा भाग म्हणून साठवण तलावालगत पाच मीटरच्या परिघात असणाऱ्या १०८ विहिरींवरील वीजजोडणी पालिकेने वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनामुळे खंडित केली आहे. परंतु खासगी डिझेल इंजिनद्वारेदेखील पाणीउपसा होणार नाही याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
शहराला १९७० मधील ४५ वर्षांपूर्वीच्या जुन्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात अनेक ठिकाणी या जुन्या पाइपलाइन लिकेज होतात, पाणी वाया जाते याकडेदेखील लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)