लोकवर्गणीतून टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:38 PM2020-04-26T23:38:54+5:302020-04-26T23:39:13+5:30
चांदगाव येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, शासकीय पाणी टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील तरुणांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाणी टँकरसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.
येवला : तालुक्यातील चांदगाव येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, शासकीय पाणी टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील तरुणांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाणी टँकरसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.
या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. तीन तासांत तब्बल १७ हजार ३०० रु पये लोकवर्गणी जमा झाली. या लोकवर्गणीतून गावासाठी पाणी टँकर सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे सामाजिक अंतर राखत गावात पाणी वाटप केले गेले.
चांदगाव येथे प्रत्येक वर्षी मार्च महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. उन्हाच्या तीव्रतेबरोबरच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे टँकरचा प्रस्ताव सादर केला मात्र, पंधरा दिवस उलटले तरी अद्यापपर्यंत टँकर मंजूर झाला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याने टँकर कधी मंजूर होतो, याची गावकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
ग्रामपंचायतीकडे पैसा नाही. त्यामुळे गावचा पाणीप्रश्न बिकट बनला. पडीक विहिरीतून पाणी शुद्ध की अशुद्ध यांची शहानिशा न करता जीव धोक्यात घालून सर्रास पिण्यासाठी पाणी वापरले जात आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने, गावातील तरु णांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप ग्रुपवर हे विदारक सत्य मांडून लोकवर्गणीच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी मदतीचे आवाहन केले.
या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, तीन तासांतच १७ हजार ३०० रु पये जमा झाले व अजूनही मदतीचा ओघ सुरु आहे. ग्रामस्थांबरोबरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षकांनी गावाला पाणीटंचाईच्या या संकटात रक्कम देऊ केली. शासकीय टँकर चालू होत नाही, तोपर्यंत १ टँकर कायमस्वरु पी पुरविण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी या लोकवर्गणीतून घेतली आहे. दरम्यान, तरु णांच्या या युक्तीने प्रशासनावर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी आपली पाण्याची गरज पूर्ण केली आहे.