वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी दहा ठिकाणी पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:50+5:302021-03-19T04:13:50+5:30
मालेगाव : तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. पाणीटंचाईची झळ नागरिकांप्रमाणे वन्यजीव सृष्टीला बसू लागली आहे. जंगलातील जलसाठे ...
मालेगाव : तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. पाणीटंचाईची झळ नागरिकांप्रमाणे वन्यजीव सृष्टीला बसू लागली आहे. जंगलातील जलसाठे संपुष्टात येत आहेत. अन्न व पाण्याच्या शाेधात वन्यप्राणी नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. भविष्यात वन्य प्राण्यांना पाणी टंचाईची झळ बसू नये, यासाठी वन विभागाने २६ पाणवठे तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर हाेताच वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी पाणवठे तयार केले जाणार आहेत. सद्यस्थितीत दहा ठिकाणी प्लास्टिक ड्रमद्वारे पाण्याची सोय केली असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे यांनी दिली.
--------------------------
वन्य प्राण्यांची पाण्यासाठी हाेणारी भटकंती थांबविण्यासाठी पाणवठे तयार केले जाणार आहेत. उपविभागीय वन कार्यालयाने फेब्रुवारी महिन्यात २६ पाणवठ्यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. निंबायती, दहिदी, झाडी, गरबड आदी जंगल क्षेत्रांमध्ये पाणवठे तयार केले जाणार आहेत. चिंचवे व पाेहाणे परिसरात पाणी उपलब्ध आहे. गरज भासल्यास येथेही पाणवठे तयार केले जातील, असे कांबळे यांनी सांगितले. सध्या प्लास्टिक ड्रम कापून त्याचा पाणी साठविण्यासाठी वापर हाेत आहे. गेल्यावर्षीही ड्रमचा उपयाेग करण्यात आला हाेता. दहा ठिकाणी ड्रम ठेवण्यात आले हाेते. जंगलात हरीण, ससे, बिबटे, तरस, लांडगे यांचा प्रामुख्याने वावर असताे. टँकरद्वारे पाणी आणून या ड्रममध्ये भरले जात आहे.