कालव्याऐवजी बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:15 AM2021-05-06T04:15:08+5:302021-05-06T04:15:08+5:30
तालुक्यातील टिंगरी गावाजवळ १९९२ साली बोरी नदीवर बोरी-आंबेदरी लघु पाटबंधारे प्रकल्प तर दहिकुटे गावाजवळ १९७५ साली कान्हेरी ...
तालुक्यातील टिंगरी गावाजवळ १९९२ साली बोरी नदीवर बोरी-आंबेदरी लघु पाटबंधारे प्रकल्प तर दहिकुटे गावाजवळ १९७५ साली कान्हेरी नदीवर दहिकुटे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या माती धरणाचे काम करण्यात आले आहे. बोरी - अंबेदरी धरणाची क्षमता ३.५४ दलघफू तर दहिकुटे धरणाची क्षमता ३.५७ दलघफू इतकी आहे.बोरी-अंबेदरी प्रकल्पाअंतर्गत झोडगे, अस्ताणे, जळकु, वनपट, लखाणे, राजमाने, दहिदी, गाळणे, टिंगरी, हरणशिकार या गावातील एकूण ९१० हेक्टर सिंचन क्षेत्र तर दहिकुटे प्रकल्पाअंतर्गत देवारपाडे, जळकु, झोडगे, चिखलओहोळ, दसाणे, दहिकुटे, माणके, सायने खुर्द या भागातील एकूण ६४८ हेक्टर इतके सिंचन क्षेत्र आहे. या दोन्ही धरणांचे कालवे खडकाळ व मुरमाड जमिनीतून जात असल्यामुळे ८० ते ९० टक्के पाणी वाया जात असते. परिणामी दोन्ही धरणांचे सिंचन क्षेत्र कमी होऊन कालव्याच्या शेवटच्या भागातील क्षेत्र सिंचनापासून वंचित राहत होते. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पाच्या कालव्यांद्वारे होणारी पाण्याची गळती रोखून शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहचून सिंचन क्षेत्राची पुनर्स्थापना करण्यासाठी बंदिस्त नलिका प्रणाली हा प्रकल्प हाती घेतला आहे.
इन्फो
सिंचन क्षेत्रात होणार वाढ
बोरी-अंबेदरी लघु पाटबंधारे या प्रकल्पाच्या ११ कि.मी. व झोडगे येथील ७ कि.मी. मध्ये बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष दुरुस्ती कामास १७.८५ कोटी रुपये व दहिकुटे उजवा कालवा बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ७.३६ कोटी रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बंदिस्त नलिकेद्वारे पाणी वाहून नेले जाणार असल्याने आवर्तन काळात पाण्याची गळती थांबून सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे.