गावठाणात आता टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:17 AM2019-07-20T01:17:16+5:302019-07-20T01:17:32+5:30
पावसाने दिलेली ओढ आणि धरणात कमी होत जाणारा साठा यामुळे शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु त्यामुळे दोन वेळा पाणी मिळणाऱ्या भागावरच अन्याय झाला अन्य भागांत कपातीची झळ पोहोचलीच नाही तर गावठाण आणि झोपडपट्टी भागात चार चार दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची वेळ आली.
नाशिक : पावसाने दिलेली ओढ आणि धरणात कमी होत जाणारा साठा यामुळे शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु त्यामुळे दोन वेळा पाणी मिळणाऱ्या भागावरच अन्याय झाला अन्य भागांत कपातीची झळ पोहोचलीच नाही तर गावठाण आणि झोपडपट्टी भागात चार चार दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची वेळ आली. अधिकाऱ्यांचे सहकार्य आणि विस्कळीत नियोजन यामुळे महापालिकेच्या महासभेत सलग सात तास वादळी चर्चा करून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले, तर महापौर रंजना भानसी यांनी सर्व अभियंते आणि विभागीय अधिकाºयांना केबीनमधून बाहेर पडा आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन समस्या सोडवा, असे आदेश महापौर रंजना भानसी दिले. त्याचबरोबर गावठाणात छोट्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे महत्त्वाचे आदेशही त्यांनी दिले.
महापालिकेची महासभा महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१९) पार पडली. यावेळी पाणीकपातीचा महत्त्वाचा प्रस्ताव महासभेवर होता. वास्तविक, पाणीकपातीचा निर्णय अगोदरच झाला होता. त्यानंतर फेरनिर्णयदेखील झाल्यानंतरही हा प्रस्ताव महासभेवर असल्याने नगरसेवकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या कपातीमुळे कोणत्या भागावर अन्याय झाला, त्याचा पाढाच नगरसेवकांनी मांडला.
नलावडे यांना धरले धारेवर
पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांना नगरसेवकांनी धारेवर धरले. ते जलशुद्धीकरण केंद्रांवर जात नाही तसेच केबीनमध्ये बसून नियोजन करतात, असे आरोप करण्यात आले. महापालिका दररोज ४६० दशलक्ष लिटर्स पाणी उपसा करते त्यातील १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचे बिलिंग होत नसल्याचा धक्कादायक प्रकार नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी उघड केला. त्याबाबतदेखील नलावडे समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.