संपूर्ण शहरात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद
By Admin | Published: March 8, 2017 01:14 AM2017-03-08T01:14:15+5:302017-03-08T01:14:28+5:30
नाशिक :आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनात अडचणी निर्माण होत असल्याने महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनात अडचणी निर्माण होत असल्याने अखेर महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सूचना आणि तांत्रिक अभिप्रायाच्या आधारे यापुढे संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार वगळता इतर दिवशी एकवेळ पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. दरम्यान, गंगापूर धरणातील घटत चाललेला पाणीसाठा लक्षात घेता महापालिकेने नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्याला सोडल्यानंतर आणि शासनाने महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात केल्याने महापालिकेने दि. ९ आॅक्टोबर २०१५ पासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर, महासभेने नोव्हेंबर २०१५ मध्येच आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा ठराव केला होता, परंतु पाण्याच्या मुद्द्यावरही राजकारण झाल्याने प्रशासनाची निर्णय घेण्याबाबत कोंडी होत राहिली. दरम्यान, जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभाग यांनी गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर सोपवत ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे बंधन घातले आणि प्रशासन जागचे हलले. विभागीय आयुक्तांच्या बैठकीत ठरल्यानुसार विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय आयुक्तांनी स्वीकारला आणि दि. २२ फेबु्रवारी २०१६ पासून त्याची अंमलबजावणी सुरू केली. परंतु, जलशुद्धीकरणनिहाय विभागवार पाणी वितरणात मोठ्या प्रमाणावर होणारी गळती, तसेच तांत्रिक अडचणी पाहता प्रशासनाची दमछाक व्हायला लागली. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा नियोजन बदलावे लागले. अखेर महापौर, आयुक्त यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात तांत्रिक अभिप्राय मागविण्यात आला. महापालिका आयुक्तांनी यापुढे आठवड्यातील दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याची लगेचच अंमलबजावणी गुरुवार वगळता इतर दिवशी नियमितपणे एकवेळ पाणीपुरवठा सुरूच राहणार आहे. परिणामी, नागरिकांना आता दर बुधवारी पाण्याचा साठा करून ठेवणे क्रमप्राप्त ठरणार आहे. (प्रतिनिधी)