नाशिकमध्ये 'अपना घर' या बांधकाम प्रकल्पात जलकुंभ कोसळून चौघे ठार; एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 10:51 AM2019-07-02T10:51:25+5:302019-07-02T10:51:39+5:30
या घटनेत जलकुंभाच्या मलब्याखाली दाबले जाऊन एक महिला एक पुरुष कामगार ठार झाले. घटनेची माहिती मिळताच सातपुर अग्निशमन उपकेंद्राचा बंब जवानांसह अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाला. या दुर्घटनेत मृतांची संख्या चार झाली
नाशिक : येथील धुर्वनगर परिसरात 'अपना घर' या बांधकाम प्रकल्पात आज सकाळी साडे आठ वाजता सुमारे 15 हजार लीटर क्षमतेचे वीस फुट उंचीचे जलकुंभ अचानकपणे कोसळून तिघा मजुरांचा मृत्यू झाला. याबाबत अग्निशमन दलाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सातपूर जवळील धुर्वनगर येथे नाशिकमधील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकच्या 'अपना घर' या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी पाण्याच्या व्यवस्थेसाठी दोन जलकुंभ तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आले होते. त्यापैकी एक जलकुंभला गळती लागलेली असल्यामुळे ते संपूर्ण आज सकाळी कोसळले. यावेळी काही पुरुष मजूर जलकुंभलगत आंघोळ तर काही महिला धुणीभांडी करत होत्या.
या घटनेत जलकुंभाच्या मलब्याखाली दाबले जाऊन एक महिला एक पुरुष कामगार ठार झाले. तर तिघे गंभीरपणे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सातपुर अग्निशमन उपकेंद्राचा बंब जवानांसह अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाला. चीफ स्टेशन ऑफिसर चंद्रकांत भोळे, लिडिंग फायरमन प्रवीण परदेशी संजय तुपलोंढे, अशोक मोरे, रमाकांत खरे, जगदीश गायकवाड, महेश बागुल यांनी बचावकार्य सुरू करत ढिगाऱ्याखाली दबलेल्या तिघा पुरुषांना जीवंत बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत महंमद बारीक (वय, 32 रा. मूळ बिहार ) बेबी सनबी खातून (वय 28 मूळ रा. बिहार) अशी मृतांची नावे आहेत. जखमींपैकी सुदाम गोहीर (३०, मुळ रा. ओडिशा, पश्चिम बंगाल), अनामी धना चंदन (५० मूळ रा. दिल्ली) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृतांची संख्या चार झाली आहे. 1 गंभीर जखमी आहे. खातून यांना लहान चार मुले आहेत. हे दोघेही मजूर म्हणून प्रकल्पात राहत होते. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट देत पाहणी केली आहे.