टंचाईग्रस्त गावांसाठी लवकरच टँकर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:12 AM2018-04-14T00:12:13+5:302018-04-14T00:12:13+5:30
तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले असूनदेखील अद्याप या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळाले नाही. या गावांना लवकरात लवकर पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे आमदार जयंत जाधव यांनी केली.
येवला : तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले असूनदेखील अद्याप या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळाले नाही. या गावांना लवकरात लवकर पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे आमदार जयंत जाधव यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी येवल्यातील टंचाईग्रस्त गावांना लवकरच पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. याबाबत जाधव यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना सांगितले की, येवला तालुक्यातील अनकाई, वसंतनगर, गोरखनगर, सोमठाण जोश, राजापूर, भुलेगाव, पांजरवाडी, आडसुरेगाव, तळवाडे, शिवाजी नगर, रेंडाळे, गारखेडे, सायगाव, महादेववाडी, जायदरे, ममदापूर तांडावस्ती, निळखेडे, हडप सावरगाव, देवठाण, तांदूळवाडी या १८ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २८ मार्च रोजी प्रस्ताव प्राप्त झाले आहे. मात्र अद्यापदेखील त्यावर निर्णय घेण्यात न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी राधाकृष्णन बी. म्हणाले की, येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देऊन तत्काळ येवल्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात येतील. मात्र त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, टंचाईमुळे शेतीची कामे बंद आहेत. त्यामुळे ज्यांना कामे नाहीत अशा मजुरांनी रोजगार हमीद्वारे केल्या जाणाऱ्या जलसंधारणाच्या कामांवर जावे, असे आवाहन केले. त्यामुळे आता लवकरच येवल्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध होणार आहे.
भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराण
येवला तालुक्यातील धनकवाडी आणि गणेशपूर येथील प्रस्ताव तहसील कार्यालयाकडून उपविभागीय कार्यालयाकडे पाठविलेले आहेत, तर वाघाळे, देवदरी, खरवंडी, नायगव्हाण आणि नगरसूल वाड्यावस्त्या असे पाच गावांचे प्रस्ताव तालुकास्तरावर आहेत. त्याचबरोबर तालुक्यात प्रचंड पाणीटंचाई वाढली असून, पंचवीस गावांचे प्रस्ताव विविध कार्यालयात मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसले असताना दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव लाल फितीत अडकवले जात आहेत. येथील भीषण पाणीटंचाईचा विचार करून वरील टंचाईग्रस्त गावांचे टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी जाधव यांनी केली.