खैरेवाडीला प्रथमच मिळाला पाण्याचा टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 07:21 PM2019-05-07T19:21:11+5:302019-05-07T19:21:40+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या खैरेवाडी या दुर्गम आदिवासी गावात श्रमजीवी संघटना आणि पंचायत समितीच्या समन्वयाने पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या खैरेवाडी या दुर्गम आदिवासी गावात श्रमजीवी संघटना आणि पंचायत समितीच्या समन्वयाने पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला.
गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी याबाबत माहिती मिळताच तातडीने पाण्याची समस्या सोडवली म्हणून ग्रामस्थांनी त्यांचे कौतूक केले.
इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे या ग्रामपंचायतीअंतर्गत खैरेवाडी ही आदिवासी वाडी आहे. ग्रामस्थांना तीन किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. यासह गावात जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नसल्याने दुष्काळात तेरावा महिना सोसावा लागतो. पाणीटंचाईचा दाह वाढत चालल्याने श्रमजीवी संघटनेने इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांच्याकडे कैफियत मांडली. पाण्याचा टँकर सुरू करण्यासाठी रस्त्याची अडचण असल्याने ग्रामस्थ आणि श्रमजीवी संघटनेने श्रमदान करून तात्पुरता रस्ता बनवला. गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वय साधून तातडीने या गावी पाण्याचा टँकर सुरू केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच यागावी टँकर आल्याने आदिवासी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
प्रतिक्रि या
खैरेवाडी गाव अतिदुर्गम भागात असल्याने सुविधा पूरवतांना तांत्रिक समस्या उदभवतात. यावर मात करून आज तातडीने पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला. श्रमजीवी संघटनेने याप्रश्नी प्रशासनाला मदत केली. भविष्यात ह्या गावाला टंचाईमुक्त करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.
- किरण जाधव, गटविकास अधिकारी, इगतपुरी.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच खैरेवाडी गावाला पाण्याचा टँकर देऊन प्रशासनाने दखल घेतली. या गावाला तृषार्थता राहू नये म्हणून श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले.
- भगवान मधे, सरचिटणीस, श्रमजीवी संघटना.