दर महिन्याला केली जाते पाण्याची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:12 AM2018-04-11T00:12:07+5:302018-04-11T00:12:07+5:30
मानोरी : पाण्यापासून अनेक प्रकारच्या रोगांची लागण होत असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमी अग्रेसर असते.
मानोरी : पाण्यापासून अनेक प्रकारच्या रोगांची लागण होत असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमी अग्रेसर असते. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील अनेक गावांत सार्वजनिक ठिकाणचे पाण्याचे स्रोत अस्तित्वात आहेत. यातील पाणीसाठा उपसा होत असो की नसो, दर महिन्याला या पाण्याची तपासणी करून पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र देत असते. मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले आरोग्यसेवक दर महिन्याला तब्बल ११ गावांत जाऊन तेथील पाणी नमुने गोळा करून तपासणीसाठी उपविभागीय प्रयोगशाळा येवला येथे देत असतात. खास करून जमिनीत असलेला पाणीसाठा जास्त दिवसांचा झाल्याने विविध प्रकारचे रोग उद्भवण्याची भीती असते. जसे मुडदूस, मूत्रपिंडाचे विकार, दंत व हाडांचे फ्लोरोसिस आदी रोग उद्भवू शकतात. अशा रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्रोताभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, १५ मीटर अंतरापर्यंत सांडपाणी साचू न देणे, शौचालय, गाईगुरांचा गोठा स्रोतापासून १५ ते २० मीटर अंतरापेक्षा जास्त लांब असावा, टाकीतून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या व्हॉल्व्हला गळती नसावी, नळाला तोटी असावी, महिन्यातून दोन वेळेस टाकी स्वच्छ धुवून काढावी, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विहिरीत ब्लीचिंग पावडर (टीसीएल) टाकावी, घरगुती पिण्याच्या पाण्याच्या माठात मेडिक्लोर टाकावे. अशी काळजी घेतल्यास पाण्यापासून होणारे रोग नाहीसे होतील, अशी माहिती मुखेड आरोग्य केंद्राचे सुनील उन्हाळे यांनी मानोरी बुद्रुक येथे पाणी तपासणी नमुने नेण्यासाठी आले असता दिली. ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या व्हॉल्व्हमधून तसेच जमिनीतून अनेक दिवसांपासून गळती होत असून, व्हॉल्व्हभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. ही सुरू असलेली पाण्याची गळती त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.