नाशिक जिल्ह्यातील ४७ हजार ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी; पाच तालुक्यांत टंचाई
By श्याम बागुल | Published: April 25, 2023 03:34 PM2023-04-25T15:34:51+5:302023-04-25T15:35:18+5:30
एप्रिल महिन्यात ही परिस्थिती असताना मे महिन्यात मात्र त्यात अधिक वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, पाच तालुक्यांतील सुमारे ४७ हजार ग्रामस्थांना २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिल महिन्यात ही परिस्थिती असताना मे महिन्यात मात्र त्यात अधिक वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत असल्याने मार्च महिन्यानंतरच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती. यंदा देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, पुन्हा अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्यामुळे ग्रामीण भागातील विहिरी, नदी, नाल्यांना मुबलक पाणी होते; परंतु मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे.
धरणाच्या पाणीसाठ्यातही कमालीची घट होऊ लागली असून, धरणातून शेवटचे आवर्तन सुटेल त्यावर शेतकरी विसंबून आहेत; मात्र पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटू लागल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. बागलाण, चांदवड, देवला, मालेगाव, येवला या नेहमीच्याच टंचाईग्रस्त तालुक्यांतील सुमारे ४७ हजार ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे