त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:03 AM2018-05-29T00:03:57+5:302018-05-29T00:03:57+5:30
तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांना भीषण टंचाई आहे. अशा अवस्थेत शासनाकडून मागील तीन दिवसांपर्यंत कोणतीच उपाययोजना केली गेली नव्हती. तथापि टंचाई काळाच्या उत्तरार्धात तालुक्यात केवळ पाच टँकर मंजूर झाले आहेत; मात्र त्यातीलही केवळ तीन टँकर प्रत्यक्षात सुरू आहेत, तर दोन टँकर अद्यापही सुरू झालेले नाहीत.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांना भीषण टंचाई आहे. अशा अवस्थेत शासनाकडून मागील तीन दिवसांपर्यंत कोणतीच उपाययोजना केली गेली नव्हती. तथापि टंचाई काळाच्या उत्तरार्धात तालुक्यात केवळ पाच टँकर मंजूर झाले आहेत; मात्र त्यातीलही केवळ तीन टँकर प्रत्यक्षात सुरू आहेत, तर दोन टँकर अद्यापही सुरू झालेले नाहीत. अत्यंत खेदाची बाब अशी दिसून येत आहे की, पाणीटंचाईसारख्या ज्वलंत आणि संवेदनशील विषयावर शासन यंत्रणाच उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. खासगी टँकर लावल्यामुळे टँकरचालकांवर कोणाचेच लक्ष नाही. वास्तविक अंबोली धरणातील पाण्याची पातळी झिरो आहे. सध्या डेडस्टॉकमधून त्र्यंबक शहरासाठी पाणी देण्यात येत आहे, पण टँकरचालक जवळचा जलाशय म्हणून अंबोलीचीच निवड करून अंबोली धरणातून टँकर भरतात. त्यामुळे धरणातील जलसाठा कमी होऊन त्र्यंबक शहराचा जलसाठा कमी होऊ शकतो. मुळेगाव व तेथील पुंगटवाडी मिलनवाडी वगैरे वाड्यांना मुळेगावचे सरपंच नामदेव काशीराम सराई हे एप्रिलपासून स्वखर्चाने टँकर पुरवित आहेत. सरपंच सराई यांचे काम खरोखरच कौतुकास्पद म्हणावे. मागील वर्षापर्यंत मुळेगाव व तेथील वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जैन फाउण्डेशन पाणीपुरवठा करीत असे. यावर्षी सरपंचच पाणीपुरवठा करीत असल्याने जैन समूहाच्या वतीने मेटघर या सर्वात उंच ठिकाणी पाच हजार लिटर्सने मेटघर किल्ला व त्याच्या दोन्ही बाजूला दिवसाआड पाणीपुरवठा करीत असल्याने मेटघरची दोन्ही बाजूची गैरसोय मिटली आहे. मेटघर ही तालुक्यातील सर्वात मोठी टंचाईची समस्या होती. जैन समूहाच्या पटणी यांनी ही बाब हेरून मेटघरच्या दोन्ही बाजूच्या पाड्यांना पाण्याची सर्वात मोठी समस्या दूर केली आहे. मेटघरच्या पाणीपुरवठ्याबाबत सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे यांनी आवाज उठविल्याने जेसीबीने रस्ता दुरुस्त करून पाच हजार लिटर्सचा टँकर आता व्यवस्थित पुरतो. तालुक्यात सर्वात भीषण पाणीटंचाई सोमनाथनगर, देवळा (आडगाव), मुरंबी, बेरवळ व मुळवड या गावांना व त्याचे पाडे, वाड्या या ठिकाणी आहे.
देवळा- करंजविहीर, टोकपाडा, काकडवळण, रानघर, भासवड, नांदुरकीपाडा, बुरुडपाडा, उंबरणापाडा व राउतमाळतर.
बेरवळ- पांगारपाणा, कुत्तरमाळ, उंबरदरी, कौलपोंडा आदी. मूळवड- घोटबारी वळण, सावरपाडा, करंजपाणा आदी पाच गावे वाड्या पाडे या ठिकाणी पाच टँकर मंजूर होऊन फक्त चार टँकर सध्या सुरू आहेत. येत्या एकदोन दिवसात पाचवा टँकर सुरू होऊन एकूण टँकरची संख्या आता तालुक्यात पाच होईल. जिल्हाधिकारी यांनी मंजुरी टँकर सोमनाथनगर, गणेशगाव वा. देवळा, मुरंबी, गावठा, बेरवळ व त्यांच्या वाडे पाडे येथे दोन असे चार व आज किंवा उद्या एक टँकर सुरू होऊन टँकरची संख्या पाच होईल.
मनमानी : परस्पर टॅँकर बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप
त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापूर्वी सुरू झालेल्या तीन टँकरपैकी दोन टँकर मुरंबी आणि बेरवळ या दोन्ही गावांच्या वाड्या, पाडे यांना पाणीपुरवठा करणारे टँकर उंच भागात चढत नसल्याने टँकरचालकानेच परस्पर बंद केले आहेत. आता म्हणे पाच हजार लिटर्सचे टँकर आणणार आहेत; मात्र अद्याप बंद करण्यात आलेले टँकर सुरू करण्यात आलेले नाहीत. आता तालुक्यात केवळ सोमनाथनगर, गणेशगाव, विनायकनगर, शिवाजीनगर, दिव्याचा पाडा आदी गावे, पाडे येथे तीन खेपा होत आहेत. दर माणशी २० लिटर पाणी देण्यात येते.