गोठेधारकांकडून पाण्याचा अपव्यय
By admin | Published: April 5, 2017 01:01 AM2017-04-05T01:01:56+5:302017-04-05T01:02:10+5:30
गोठेधारकांकडूनपाण्याचा अपव्यय
इंदिरानगर : वडाळा गावातील काही गोठेमालकांकडून विद्युत मोटारींद्वारे पाणी खेचून त्याचा अपव्यय केला जात असून, अशा गोठेमालकांवर महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या गोठ्यांकडे अनधिकृत नळजोडणी आहे. यामुळे महापालिकेच्या पाणीपट्टीचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
गतवर्षी गंगापूर धरणात अत्यंत कमी जलसाठा असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होता. यंदा धरणात मुबलक जलसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या वितरण आणि यांत्रिक विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच गावात काही नागरिकांनी मुख्य जलवाहिनीला विद्युत मोटारी लावून पाणीचोरीचा सपाटा लावला आहे. काही गोठेधारकांनी तीन इंच नळजोडणी घेऊन सर्रासपणे विद्युत मोटारी लावून पाणी खेचण्याची जणू स्पर्धाच लावली आहे. यामुळे परिसरात ऐन उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई सुरू झाली आहे. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. परिसरातील त्रस्त नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)