साधुग्राममध्ये पाण्याचा अपव्यय
By admin | Published: September 8, 2015 11:48 PM2015-09-08T23:48:17+5:302015-09-08T23:49:29+5:30
साधुग्राममध्ये पाण्याचा अपव्यय
नाशिक : एकीकडे शहरावर पाणी कपातीचे संकट असताना साधुग्राम परिसरात मात्र काही ठिकाणी पाण्याचे नळ धो धो वाहताना दिसतात. शहर परिसरातील सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर भागात कमी दाबाने पाणी येत असताना साधुग्राममध्ये मात्र २४ तास पाण्याचे नळ सुरू असल्याने वाया जाणाऱ्या पाण्याकडे पाणीपुरवठा विभागासह कोणाचेच लक्ष नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात केवळ ५८ टक्के पाणी साठा असल्याने पावसाची अवकृपा झाल्यास शहरातील नागरिकांवर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे करोडो रुपये खर्चून साधुग्राममध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाच्या वतीने वीज, पाणी, रस्ते आदिंसह सर्व मूलभूत सोयी पुरविण्यात आल्या असल्या तरी, सर्व काही मोफत मिळत असल्याने त्याची कोणाला किंमत नाही किंबहुना पर्वादेखील दिसत नाही.
सेक्टर- २ मध्ये अनेक खालशांजवळ अशीच नळगळती सुरू आहे. अनेक खालशांमध्ये साधू-महंतांसाठी स्नानाच्या व्यवस्थेसाठी तात्पुरते बाथरूम तयार करण्यात आल्याने त्याठिकाणी नळांची गळती सुरूच दिसते. तर शौचालये मात्र पाणी न टाकल्याने घाणीने भरलेले दिसतात. सेक्टर तीन व चारमध्ये फारशी गर्दी नसल्याने तिकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी जणू काही बेवारसपणे नळ सुरू असतात.
तपोवन पोलीस चौकीलगतच पाण्याची टाकी असून, याठिकाणी पिण्याच्या पाण्याला शुद्धीकरण यंत्र बसवून पुरवठा केला जातो. मात्र भाविक हातपाय धुणे, तोंड धुणे यासाठी सतत नळ सुरू ठेवतात. परंतु तेथे उभे असलेले मनपा कर्मचारी, स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते किंवा पोलीस कुणीही याबाबत हटकत नाही.