गंगापूर धरणातून आज होणार पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:24 AM2021-07-29T01:24:44+5:302021-07-29T01:25:38+5:30
गंगापूर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ३३ टक्के असलेला धरणातील पाण्याचा साठा बुधवारी (दि. २८) सायंकाळी ७५ टक्केपर्यंत पोहोचल्याने गुरुवार (दि. २९)पासून धरणातून विसर्ग केला जाणार आहे.
नाशिक : गंगापूर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ३३ टक्के असलेला धरणातील पाण्याचा साठा बुधवारी (दि. २८) सायंकाळी ७५ टक्केपर्यंत पोहोचल्याने गुरुवार (दि. २९)पासून धरणातून विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राज्यात सर्वदूर पाऊस असताना नाशिक जिल्ह्यावर मात्र पाऊस रुसला असल्याने पाण्याची चिंता निर्माण झाली होती. धरणातील पाणी आटल्यामुळे नाशिक शहरावर पाणीकपातीचे संकट ओढावले. सध्या दर गुरुवारी ‘ड्राय डे’ लागू करण्यात आला आहे. धरणाने गाठलेला तळ तसेच पावसाअभावी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट गडद होत असतानाच पावसाच्या सरी बरसल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. गेल्या पंधरा दिवसांपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पातळीत वाढ होत आहे.
तीन ते चार दिवसांपूर्वी धरणातील पाणीसाठा ६३ टक्क्यांवर पोहोचला होता तर गुरुवारी सायंकाळपर्यंत जलसाठा ७५ टक्के झाला आहे. धरणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गंगापूर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने गुरुवार, दि. २९ रोजी सकाळी १० वाजता धरणातून ५०० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. धरणात होणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती आपत्ती विभागाकडून देण्यात आली.
--इन्फो--
गुरुवारी सकाळी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रातील पाणी वाढणार असल्याने काठावरील नागरिकांनी आपले घर आणि दुकानांमधील साहित्याची काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या जात आहेत.