जलकुंभ धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:51 PM2018-08-18T23:51:49+5:302018-08-19T00:15:12+5:30
सटाणा : शहराला तब्बल ४१ वर्षांपासून पाणीपुरवठा करणारा जलकुंभ धोकादायक बनला असून, केव्हाही कोसळण्याची भीती संरचना परीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट) अहवालात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या एक वर्षापासून हा अहवाल प्राप्त होऊनही भर रस्त्यावर असलेल्या या धोकादायक जलकुंभाबाबत कोणत्याही उपाययोजना न केल्याने पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सटाणा : शहराला तब्बल ४१ वर्षांपासून पाणीपुरवठा करणारा जलकुंभ धोकादायक बनला असून, केव्हाही कोसळण्याची भीती संरचना परीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट) अहवालात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या एक वर्षापासून हा अहवाल प्राप्त होऊनही भर रस्त्यावर असलेल्या या धोकादायक जलकुंभाबाबत कोणत्याही उपाययोजना न केल्याने पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
येथील पालिकेच्या अखत्यारितील मुख्य प्रशासकीय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर, पंडित धर्माजी पाटील जलकुंभ, तुकाराम गणपत सोनवणे जलकुंभ यांचे गेल्या वर्षी संरचना परीक्षण करण्यात आले. गेल्या १४ जून २०१७ रोजी प्राप्त झालेल्या या संरचना परीक्षण अहवालात ताहाराबाद रस्त्यावरील पंडित धर्माजी पाटील जलकुंभ गळका व पडका झाल्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना जलकुंभाच्या आजूबाजूला असलेल्या व्यापारी व शालेय प्रशासनाने वेळोवेळी गळका जलकुंभ दुरुस्त करण्याची मागणी केली होती.
मात्र अनेकवेळा मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्टची माहितीचा अधिकार वापरून मागणी केली होती. या आॅडिटमध्ये खळबळजनक माहिती उघडकीस आली. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १९७६ मध्ये आरसीसी बांधकाम असलेला सुमारे ७ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला.
तांत्रिकदृष्ट्या या जलकुंभाचे दर पंधरा वर्षांनी स्ट्रक्चरल आॅडिट करून आवश्यक सूचनेनुसार दुरुस्ती करून घेणे आवश्यक असते; मात्र पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वेळोवेळी देखभाल दुरु स्ती न झाल्यामुळे हा जलकुंभ गळका आणि पडका झाला आहे. दरम्यान भर रस्त्यावरील आणि आजूबाजूला व्यापारी संकुल, शाळा असून, या धोकादायक जलकुंभामुळे मालमत्ता तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असताना कोणत्याही उपाययोजना न केल्याने पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे अहवालात
पंडित धर्माजी पाटील जलकुंभाचा स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट १४ जून २०१७ ला पालिका प्रशासनाला प्राप्त झाला. या रिपोर्टमध्ये जलकुंभाच्या ९ कॉलम पैकी २ कॉलमचे सीमेंट कॉँक्र ीट निघालेले असून आतील गज गंजलेल्या अवस्थेत आहेत. जलकुंभाच्या उभ्या भिंतींना मोठमोठे तडे जाऊन गज गंजून खराब झाल्यामुळे पाण्याची गळती सुरू आहे, जलकुंभाचे तळाचे छत व जलकुंभाच्या पायऱ्या यांचे लोखंडी गज उघडे पडून गंजून खराब झाले आहेत. एकंदरीत या आॅडिटमध्ये हा जलकुंभ पूर्ण क्षमतेनुसार कार्यरत नसून तो भविष्यात केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे, असे नमूद करण्यात आले आहे. हा रिपोर्ट नाशिकच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या अभियंत्यांनी दिला आहे.