गोदावरीला पाणवेलींचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:17 AM2018-03-22T00:17:28+5:302018-03-22T00:17:28+5:30
ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीच्या पात्रात पाणवेली पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असून, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे.
सायखेडा : ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीच्या पात्रात पाणवेली पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असून, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे. गोदाकाठ भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा सायखेडा परिसरातून होत आहे. कूपनलिकेच्या अनेक विहिरी आणि पाइपलाइन या परिसरातून असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. खराब पाण्यामुळे साथीचे रोग पसरून विविध रोगांना आमंत्रण दिले जात आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यामुळे पश्चिमेला सायखेडा, चाटोरीपर्यंत थोप असल्याने या भागात पाण्याला संथ प्रवाह असतो. त्यामुळे पाण्याबरोबर वाहत आलेल्या पाणवेली अनेक ठिकाणी अडकून आहे. त्यामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी हिरवेगार, परिसरात डास, अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. दूषित पाण्यामुळे साथींच्या आजारांना आमंत्रण दिले जात आहे. नदीपात्रातील पाण्याला बेरंग आला असून, बहुतेक गावांत नदीपात्रातून थेट उपसा करून पाणीपुरवठा केला जात असल्याने, हिरवा रंग, दर्पवास, जंतुसद्श दूषित पाणीपुरवठा होतो. उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्रामस्थ पाणी विकत घेऊन, आपली तहान भागवत आहेत. यात ग्रामस्थांचे हाल होत असून, ग्रामस्थांबरोबरच जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाणवेली काढून टाकाव्यात, अशी मागणी होत आहे.
निफाड तालुक्याच्या दक्षिणेकडील अनेक गावांना पिण्यासाठी गोदावरी नदीच्या तीरावरून कूपनलिकेतून पाणीपुरवठा केला जातो. नदीलगतच्या सर्व गावांना पाणीपुरवठा होत असतो. नदीवर पसरलेल्या पाणवेलींमुळे अनेक साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने तातडीने पाणवेली काढाव्यात.
- गोकुळ गिते, पिंपळगाव