गोरेराम लेन परिसरात पाणीबाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:05 AM2019-07-25T01:05:13+5:302019-07-25T01:05:31+5:30
गेल्या महासभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सुमारे सहा तास चर्चा झाल्यानंतरदेखील शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, गोरेराम लेनमध्ये तर महिनाभरापासून अनेक भागात पाणी मिळणे बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
नाशिक : गेल्या महासभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सुमारे सहा तास चर्चा झाल्यानंतरदेखील शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, गोरेराम लेनमध्ये तर महिनाभरापासून अनेक भागात पाणी मिळणे बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. येथील नागरिकांना सोन्या मारोती मंदिराजवळील सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागत आहे.
महापालिकेने शहरात पाणीकपात केल्यानंतर त्याचे अनेक भागात नियोजन चुकले असून, पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. गेल्या १९ जुलै रोजी झालेल्या महासभेत यासंदर्भात जोरदार चर्चा झाली होती. महापालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांना महापौरांनी तंबी देऊन भल्या सकाळी फिरून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले होते.
परंतु त्याचा फार फायदा झालेला नाही. शहरातील मध्यवर्ती भागातील रविवार कारंजा परिसरातील गोरेराम लेन येथे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई जाणवत असून, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी करूनदेखील कार्यवाही झालेली नाही.
अन्यत्र भटकंती
गेल्या महिनाभरापासून लेनमधील नागरिकांना सराफ बाजारातील सार्वजनिक नळाच्या ठिकाणी जावे लागते. तेथे सकाळी सहा ते सात या वेळात भरावे लागते. परंतु अन्य भागातील लोक त्याठिकाणीच पाणी भरण्यासाठी येत असल्याने तेथेही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यातच अनेक नागरिक कमी दाबाने पाणी येत असल्याने ते मोटारी लावून नळाचे पाणी खेचून घेतात त्यामुळे काही नागरिकांना पाणीच मिळत नाही.
गेल्या महिनाभरापासून परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. महापालिकेनेही समस्या तातडीने सोडवावी. पाण्याअभावी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते़
- भारत मैड, रहिवासी, गुप्ता वाडा
पिण्याचे पाणी शोधावे लागत असल्याने हाल होतात. शाळा सोडून मुलांना स्टॅँडपोस्टवर पाणी भरण्यासाठी ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे आम्हाला वेळेवर शाळेत जाता येत नाही़ तसेच अभ्यासावर देखील परिणाम होत आहे़
- प्रसाद भालेकर, विद्यार्थी
पाणी मिळत नसल्याने महिलांना काम सोडून धावपळ करावी लागते आणि स्टॅँड पोस्टवरून पाणी आणावे लागते. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत केला पाहिजे. पाण्याअभावी घरातील अनेक कामे पडून राहतात़
- मंदा ढापसे, साळुंके वाडा
परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येते, जवळपास पाणी मिळत नसल्याने महिलांना पाण्यासाठी फिरावे लागते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा़
- उषा कपिला, रहिवासी