वडाळागावात ‘पाणीबाणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:00 AM2018-04-06T01:00:43+5:302018-04-06T01:00:43+5:30
नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने वडाळावासीयांवर दोन दिवसीय जलसंकट ओढावले.
नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने वडाळावासीयांवर दोन दिवसीय जलसंकट ओढावले. हे संकट पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे अधिक भयावह झाल्याचे चित्र गुरुवारी (दि.५) सकाळी पहावयास मिळाले. पिण्याच्या पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षेनंतर गावात येणाºया टॅँकरवर महिलांची झुंबड उडाली, तर एका भागात संतप्त महिलांनी रिकामे हंडे टॅँकरच्या दिशेने भिरकावत महापालिके च्या गलथान कारभाराचा निषेधही नोंदविला.
जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाºया मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती रोखण्यासाठी मंगळवारपासून महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने ज्या भागांमधील दैनंदिन पाणीपुरवठ्यावर या दुरुस्ती कालावधीत परिणाम होणार आहे, त्या परिसराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर केले; मात्र याबरोबरच पर्यायी व्यवस्था करण्याचा विसर संंबंधित अधिकाºयांना पडल्यामुळे वडाळागाव परिसरात पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे दोन दिवसांपासून आतोनात हाल होत आहे. लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंतच कुटुंबांमधील सर्वच सदस्य पाण्याच्या शोधात हंडे, कळशी, बादली घेऊन घराबाहेर भटकंती करताना बुधवारपासून दिसून येत आहे. ज्या भागात टॅँकर पोहचला त्या भागात धाव घेऊन मिळेल तेवढे पाणी घेत घर गाठायचे असा जणू उपक्रमच बुधवारपासून दोन दिवस वडाळावासीयांचा सुरू होता. अपुरे टॅँकर आणि त्यामुळे उद्भवणारे भांडण सोडविताना नगरसेवकांच्याही नाकीनव आले. काही परिसरात नगरसेवकांना महिलांच्या रोषाचा सामनाही करावा लागल्याचे दिसून आले. अवघे दोन टॅँकरद्वारे वडाळागावाची तहान भागाविण्याचा पोरखेळपणा महापालिकेच्या प्रशासनाने केला हे विशेष! यामुळे ओढावलेले जलसंकट अधिक वाढले आणि नागरिकांचा संतापही यामुळे दिसून आला. ज्या भागात टॅँकर पोहचले त्या भागातील लोक आनंदी मात्र दुसºया भागातील लोकांनी तिकडे धाव घेतल्यास आपापसांत भांडण होऊन हंड्यांची फेकाफेकही झाली.
आज हवा पुरेसा पाणीपुरवठा
दोन दिवसांपासून वडाळागाव परिसरात पाणीपुरवठा बंद होता, त्यामुळे वडाळागावात शुक्रवारी तरी जादा दाबाने व पुरेशा वेळेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शुक्रवारी कृत्रिम पाणीटंचाईची समस्या उद्भवणार नाही, याबाबत प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे. दोन दिवसांपासून ‘पाणीबाणी’ वडाळावासीयांवर झाल्यामुळे शुक्रवारच्या दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ वाढवून देण्याची किंवा सकाळ-संध्याकाळ पाणीपुरवठा करण्याची मागणी त्रस्त रहिवाशांनी केली आहे.