दरमहा मिळणार पाणीपट्टी बिल
By admin | Published: October 30, 2016 01:11 AM2016-10-30T01:11:14+5:302016-10-30T01:11:38+5:30
महापालिका : सोसायट्यांचा समावेश
नाशिक : महापालिकेकडून आता शहरातील सुमारे ६० टक्के सोसायट्या, अपार्टमेंट यांच्यासह सहा हजारांच्या आसपास व्यावसायिक आस्थापनांना दरमहा पाणीपट्टीचे बिल देण्यात येणार असून, आयुक्तांनी सदर प्रस्तावास मंजुरी दिल्याने लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.
महापालिकेमार्फत शहरात पाणीपट्टीची बिले दर तीन महिन्यांनी दिली जातात. परंतु, मनुष्यबळाअभावी पाणीपट्टीची बिले देण्यास विलंब होत असल्याने त्याचा परिणाम वसुलीवर आणि उत्पन्नावरही होऊ लागला आहे. महापालिकेने मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता पाणीपट्टी बिलांचे वाटप आउटसोर्सिंगद्वारे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महासभेने त्यास मंजुरीही दिली आहे. त्यानुसार, पाणीपट्टी व घरपट्टी विभागाने आता पाणीपट्टीची बिले आॅनलाइन भरण्यासाठी सवलत उपलब्ध करून दिलेली असतानाच ग्राहकांच्या हाती दरमहा पाणीबिल मिळेल, अशी यंत्रणा राबविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. शहरात १ लाख ९५ हजार मिळकती आहेत. त्यातील ६० टक्के मिळकती या सोसायट्या, अपार्टमेंट आहेत तर ५८९७ या व्यावसायिक आस्थापना आहेत. महापालिकेमार्फत या सोसायट्या, अपार्टमेंट व व्यावसायिक आस्थापनांना दर महिन्याला आॅन द स्पॉट पाणीपट्टीचे बिल दिले जाणार आहे. पाणीमीटरसंबंधीही ग्राहकांच्या तक्रारी असतील तर त्यांचेही निराकरण महापालिकेमार्फत केले जाणार आहे. मात्र, चाळी, झोपडपट्ट्या आणि शासकीय इमारती यांना पूर्वीप्रमाणेच दर तीन महिन्यांनी बिले पाठविली जाणार आहेत. (प्रतिनिधी)