‘वॉटरप्रूफ’ पतंगांची नाशिककरांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:08 PM2017-12-27T13:08:27+5:302017-12-27T13:22:21+5:30
पारंपरिक कागदी तसेच प्लॅस्टिक पतंग उडविण्याबरोबरच काहीतरी वेगळेपण हवे यासाठी बाजारात नव्याने दाखल झालेले वॉटरप्रूफ पतंग ग्राहकांना आक र्षित करीत आहेत.
स्वप्नील जोशी
नाशिक : डोरेमॅन, आऊल, बटरफ्लाय, ईगल, सिंड्रेला या आणि अशा विविध आकारातील वॉटरप्रूफ पतंग शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले असून, वेगवेगळ्या आकारातील आणि वेगवेगळया रंगसंगतीतील पतंग खरेदीसाठी तरुणांसह बालगोपाळांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. पर्यावरण संवर्धनाचा विचार करता नायलॉन मांजाला बंदी घालण्यात आल्यानंतर आता पतंगप्रेमींना १६ तारी सुती मांजा पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे.
पारंपरिक कागदी तसेच प्लॅस्टिक पतंग उडविण्याबरोबरच काहीतरी वेगळेपण हवे यासाठी बाजारात नव्याने दाखल झालेले वॉटरप्रूफ पतंग ग्राहकांना आक र्षित करीत आहेत. दोन फुटांपासून दहा ते बारा फुटांपर्यंतच्या ३० हून अधिक वेगवेगळ्या आकारातील पतंग ३० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. नाशिकच्या बाजारपेठेत मुंबईसह दिल्ली, सुरत, मध्य प्रदेश आदी भागांतून पतंग आणि मांजा उपलब्ध झाला असून, तीन तारी, पाच तारी, आठ तारी, सोळा तारी मांजांना मागणी वाढू लागली आहे.
मकरसंक्रांत सणाला अद्याप अवकाश असला तरीही नागरिकांनी विशेषत: विद्यार्थी आणि युवकांनी पतंग खरेदीला सुरुवात केली आहे. पारंपरिक कागदी आणि प्लॅस्टिक पतंग विकत घेताना ग्राहक विशेष काळजी घेताना दिसून येतात. पातळ आणि हलक्या कागदासह पतंगाला लावण्यात येणाºया काड्यांची योग्य खातरजमा करूनच पतंग खरेदी केले जात आहेत. कागदी पतंग दोन रुपयांपासून पंचवीस रुपयांपर्यंत, तर प्लॅस्टिक पतंग एक रुपयापासून २० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पर्यावरण संवर्धनाची चळवळ व्यापक होऊ लागल्याने तसेच नायलॉन मांजाला बंदी असल्याने अनेक पतंग विक्रेत्यांनी पर्यावरणाचे हित जोपासत आपल्या दुकानांमध्ये प्लॅस्टिक पतंगदेखील विक्रीसाठी ठेवलेले नाहीत.