मुक्त विद्यापीठातील पदाधिकाऱ्यांच्या नावे बनावट मेसेजचे पेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:53+5:302021-05-14T04:15:53+5:30
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून पैशांची मागणी केल्याचा ...
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून पैशांची मागणी केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता विद्यापाठीचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांचा प्रोफाईल फोटो वापरून एका ऑनलाईन विपणन करणाऱ्या कंपनीच्या गिप्टकार्ड खरेदीचे आवाहन करणारे फेक मेसेज पाठविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुक्त विद्यापीठातील पदाधिकाऱ्यांच्या नावे सलग दुसऱ्यांदा असा प्रकार समोर आल्याने एकप्रकारे बनावट मेसेजचे पेवच फुटल्याची चर्चा विद्यापीठ आवारात होत आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांटा फोटो डीपीला ठेवून त्यांच्या संपर्कातील व्यक्ती व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांना एका व्हॉट्स ॲप क्रमांकावरून ऑनलाईन विपणन कंपनीच्या गिप्ट कार्ड खरेदीचे आवाहन करणारे मॅसेज पाठविण्यात आले. परंतु , प्रोफाईस फोटो जरी डॉ. दिनेश भोंडे यांचा असला तरी नवीन मोबाईल क्रमांक असल्याचे त्यांच्या काही जवळच्या व्यक्तींच्या लक्षात आले. यात विद्यापीठाच्या संचालक डॉ. कविता साळुखे, यांनी समन्वयक डॉ. गावंडे, डॉ विजया पाटील यांनाही असा मेसेज प्राप्त झाल्याने त्यांनी तात्काळ याविषयी डॉ. दिनेश भोंडे यांना माहिती दिली असता त्यांनी अशा प्रकारे कोणतेही मेसेज पाठविले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉ. दिनेश भोंडे यांनी तात्काळ याविषयी खुलासा केला असून अशा प्रकारच्या बनावट मेसेजेसला कोणीही बळी पडू नये असे आवाहन केल्याची माहिती विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.