वावी २५ जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 08:43 PM2020-07-14T20:43:20+5:302020-07-15T01:15:01+5:30
सिन्नर : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वावी गावात शनिवारी कोरोनाने प्रवेश केला. त्यानंतर मंगळवारी कोरोनाचा दुसरा रुग्ण नाशिकच्या खासगी रुग्णालय उपचार घेताना आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सिन्नर : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वावी गावात शनिवारी कोरोनाने प्रवेश केला. त्यानंतर मंगळवारी कोरोनाचा दुसरा रुग्ण नाशिकच्या खासगी रुग्णालय उपचार घेताना आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
वावी गावातील वीसवर्षीय युवतीचा व नंतर ५९ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येऊन २५ जुलैपर्यंत आरोग्य सेवेसह इतर सर्व प्रकारचे व्यवसाय व सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.
पांगरी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कात गावातील एक डॉक्टर व त्यांचे तीन सहायक असल्याने वावी गावात घबराट पसरली होती. त्यापाठोपाठ संगमनेर येथे उपचारासाठी गेलेल्या २० वर्षीय युवतीचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांच्या भीतीमध्ये अधिकच भर पडली आहे. संबंधित युवती सिन्नर येथील नगर परिषदेच्या रुग्णालयात उपचार घेत असून, तिच्या संपर्कातील नऊ, तर पांगरी येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरसह चौघा जणांची तपासणी करून घेण्याचा निर्णय आरोग्य यंत्रणेने घेतला आहे. तथापि, डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने वावीकरांनी सुस्कारा सोडला होता. मात्र मंगळवारी आणखी एक ५९ वर्षीय पुरुष बाधित आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. याशिवाय या सर्वांच्या संपर्कातील व्यक्तींनादेखील पुढील दोन आठवडे स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना बाधितांची घरे मध्यवस्तीत असल्याने गावच कंटेन्मेंट घोषित केले आहे.
करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ अजिंक्य वैद्य यांनी दिली. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देऊन रविवार दि 12 पासून गावातील सर्व व्यवसायिकांना दुकाने न उघडण्याबाबत सुचित करण्यात आले. किराणा व भाजीपाला विक्री व्यवसाय देखील या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, पांगरी येथील रुग्णाच्या निकट संपर्कातील डॉक्टरांचा खासगी लॅबमधील तपासणीचा अहवाल रविवारी सायंकाळी निगेटिव आल्यानंतर ग्रामस्थांची भीती काही अंशी दूर झाली आहे. परंतु डॉक्टरांकडे कामाला असलेल्या तीन सहाय्यकांची तपासणी रिपोर्ट मंगळवारी दुपारपर्यंत आले नव्हते.
------------------
३५० घरांचे सर्वेक्षण
गावाच्या मध्यवर्ती भागात दोन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेकडून संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे. निम्म्यापेक्षा अधिक गाव त्यामुळे प्रतिबंधित होणार असले तरी गावातील नागरिकांची वर्दळ पाहता संपूर्ण गावात एकावेळी कंटेन्मेंट करून गावाच्या सीमा सील कराव्यात, असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुचवण्यात आले. दोन्ही बाधित रुग्णांची घरे केंद्रस्थानी ठेवून गावातील ३५० कुटुंबांचे दैनंदिन सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. पुढील चौदा दिवस हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य वैद्य यांनी सांगितले.