वावी पोलिसांकडून पेट्रोलपंपचालकावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:46+5:302021-05-18T04:14:46+5:30
सिन्नर : कडक लॉकडाऊनमध्ये अनावश्यक कारणासाठी फिरणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना इंधन देऊन नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना खोपडी खुर्द शिवारातील ...
सिन्नर : कडक लॉकडाऊनमध्ये अनावश्यक कारणासाठी फिरणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना इंधन देऊन नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना खोपडी खुर्द शिवारातील पेट्रोलपंपावरून ग्राहकांना पेट्रोल दिले जात असल्याचे समोर आल्यानंतर वावी पोलिसांनी धन्वंतरी पेट्रोलियम (बारगळ पेट्रोलपंप)च्या मालक व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वावी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्याने १२ ते २३ मेदरम्यान कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात अनावश्यक कारणासाठी नागरिक बाहेर फिरू नये, यासाठी त्यांना पेट्रोलपंपावरून इंधन देऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी होते का नाही याची खात्री करण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक श्रीमती वालावकर, उपविभागीय अधिकारी भोसले यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. वावी पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक सागर कोते यांनी साध्या वेशातील पोलिसांना खोपडी खुर्द शिवारात अनावश्यक कारणासाठी पेट्रोल मिळते का याची खात्री करण्यासाठी डमी ग्राहक म्हणून पाठवले होते. त्यांना अनावश्यक कारणासाठी पेट्रोल मिळाल्यानंतर पोलिसांनी पेट्रोलपंप मालक व कर्मचाऱ्यांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
---------------
‘कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन होणे आवश्यक आहे. असे असताना अनावश्यक कारणासाठी पेट्रोल दिले जात असल्याने कारवाई करण्यात आली. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये.
- सागर कोते, साहाय्यक पोलीस निरीक्षक, वावी