आदिवासींची ‘फडकी’ नामशेष होण्याच्या मार्गावर
By Admin | Published: August 1, 2016 12:29 AM2016-08-01T00:29:32+5:302016-08-01T00:29:49+5:30
काळाचा महिमा : आधुनिक फॅशनच्या लाटेमुळे वापर कमी
भाग्यश्री मुळे नाशिक
महाराष्ट्रातील आदिवासी महिलांच्या अंगावर पूर्वी सहजतेने आढळणारी ‘फडकी ’ आधुनिक फॅशनच्या लाटेमुळे मागे पडली असून त्याचा वापर कमी झाल्याने मागणी आणि उत्पादनावरही परिणाम दिसून येत आहे. विदेशात वाढती मागणी असलेली फडकी स्थानिक पातळीवर मात्र वापरणेच बंद झाले आहे.
साडीप्रमाणे वापरले जाणारे आणि जुने झाल्यानंतर बाळाची झोळी, गोधडीचे अस्तर, भाजीपाला बांधण्याचा आवडीचा कपडा, शेतात काम करताना लहान मुलाला पाठीशी बांधण्यासाठी भक्कम कपडा अशा बहुपयोगी ‘फडक्या’चा वापर आता कमी झाला असून शिक्षणाची कास धरणाऱ्या आदिवासी लेकींना फडकी वापरणे कमीपणाचे वाटू लागल्याने, तसेच इतर पर्याय उपलब्ध झाल्याने फडके मागे पडत चालले आहे.
आदिवासी गरीब, आर्थिक परिस्थितीशी झुंज देत जीवन जगणारे असतात. त्यामुळे पूर्वीच्या काळी इतर सर्व गरजेच्या वस्तूंबरोबरच वस्त्रही शासनाकडून आदिवासींना पुरविले जात असे. त्यातील साडीचा कपडा अपूर्ण असायचा. त्यामुळे त्याला जोड म्हणून हे फडके वापरले जाऊ लागले. आदिवासी महिलांची ओळख म्हणून हे कपडे खूप प्रचलित झाले. काळा, लाल, चॉकलेटी, केशरी अशा गडद रंगांमध्ये आणि पानाफुलांच्या बारीक नक्षीत, डॉट प्रिंटमध्ये हे फडके खास राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातही तयार केले जायचे. आजही ते या ठिकाणी तयार होते. पण पूर्वीच्या प्रमाणापेक्षा आता त्याची मागणी कमी झाल्याने निर्मितीही कमी झाली आहे.
उभ्या महाराष्ट्राला आणि देशाच्या इतर भागातही फडक्यांची मागणी पूर्ण करणाऱ्या सटाण्याजवळील ठेंगोड्यातही आता मागणीअभावी व्यवसाय ठप्प झाला आहे. फडकी तयार करणाऱ्या रंगारी समाजाच्या १५-२० कुटुंबांपैकी आता केवळ तीन कुटुंबे या व्यवसायात शिल्लक आहेत. मागणी कमी झाल्याने उर्वरित व्यावसायिकांनी व्यवसाय बदलला आहे, तर काहींनी गावच सोडले आहे. परंपरागत व्यवसाय टिकवून ठेवला पाहिजे, त्याचे अस्तित्व आणि गावाची ओळख पुसून जाऊ नये म्हणून ज्या तीन कुटुंबांनी या फडकी निर्मितीचा व्यवसाय सुरू ठेवला आहे, त्यांनाही आर्थिकदृष्ट्या तोटा सहन करावा लागत आहे. फडकीला आदिवासी समाजाबरोबरच इतर समाजाकडूनही मागणी असते. इतर समाजानेही वापर थांबविल्याने फडकीचा व्यवसाय बसला आहे. मराठासह इतर जातींमध्ये लग्नाचा बस्ता खरेदी करताना प्रथम ‘फडकी’ची खरेदी केली जायची. हे फडके अंथरून त्यावरच लग्नाच्या बस्त्यासाठी खरेदी केलेले कपडे (साड्या, महावस्त्र, शर्टपिस, उपरणे, फेटे आदि) ठेवून तो बस्ता बांधला जायचा. याला शुभ शकुन म्हटले जायचे. बांधल्यावरच त्याला बस्ता म्हटले जायचे व तो व्यवहार किंवा लग्नातला महत्त्वाचा सोहळा पूर्ण झाला, असे मानले जायचे. आता कालौघात नवीन पिढीतले लोक ‘फडकी’ नंतर पडूनच राहात असल्याने कशाला खरेदी करायची घ्यायची, असा विचार करतात. त्यामुळे बस्ता खरेदीतल्या फडक्याच्या खरेदीला फुली मारण्यात आली. इतर समाजाने अशाप्रकारे फडकीकडे पाठ फिरविल्यामुळे मागणी कमी झाली आहे.