वाघाड भरण्याच्या मार्गावर; करंजवण धरण निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:18 AM2021-09-15T04:18:34+5:302021-09-15T04:18:34+5:30
तालुक्यातील कोलवण, कादवा, धामण नद्या खळखळून वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे, पालखेड धरणातील पाणीसाठा ९४ टक्के झाला असून, पालखेड धरणातून कादवा ...
तालुक्यातील कोलवण, कादवा, धामण नद्या खळखळून वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे, पालखेड धरणातील पाणीसाठा ९४ टक्के झाला असून, पालखेड धरणातून कादवा नदी पात्रात ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दिंडोरीच्या पश्चिम भागामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे वाघाड धरण ८६ टक्के भरले पावसाचा जोर वाढल्यास दोन दिवसांत वाघाड धरण पूर्ण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वात मोठे करंजवण धरण ५४ टक्क्यांच्या आसपास पोहोचले असून, ननाशी व कोशिंबे परिसरात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे करंजवण धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. तालुक्यातील मांजरपाडा (देवसाणे) प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुणेगाव धरणात मांजरपाडा (देवसाणे) प्रकल्पाचे पाणी येण्यास सुरुवात झाल्यामुळे पुणेगाव धरणाचा पाणीसाठा ७५ टक्के झाला आहे. पुणेगाव धरण पूर्ण भरल्याशिवाय ओझरखेड धरणामध्ये पाणी येत नसल्यामुळे सध्या धरणाचा पाणीसाठा ३७ टक्के इतकाच झाला आहे. तालुक्यात तीसगाव धरणाचा सर्वात कमी २२ टक्के पाणीसाठा असल्यामुळे परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये चितेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, असा पाऊस तालुक्यात चार ते पाच दिवस पडत राहिल्यास धरणे भरण्यास वेळ लागणार नाही, अशी चर्चा तालुक्यात होत आहे.