तरुण पिढी गुन्हेगारीच्या वाटेवर
By admin | Published: February 18, 2016 12:00 AM2016-02-18T00:00:06+5:302016-02-18T00:03:24+5:30
संगणकीय अज्ञान : अनेकजण वाहन परवान्यापासून वंचित
इंदिरानगर : प्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना घेण्यासाठी आॅनलाइन परीक्षा कमी शिक्षण असलेल्या आाणि संगणकाचे ज्ञान नसलेल्या नागरिकांसाठी डोखेदुखी ठरत आहे. संगणकाचे अज्ञान, अशिक्षितपणा यामुळे नोकरी व उद्योगधंदा मिळविण्यासाठी वाहन चालविण्याचा परवाना मिळत नसल्याने अनेक तरुण नैराश्यातून गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच तोंडी परीक्षा घेऊन चालक परवाना मिळण्याचा मार्ग सुखकर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
घरची परिस्थिती उद्योगधंदा करण्याची नसल्याने अनेक कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे अनेक पालक त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यास असमर्थ ठरतात, अशा मुलांना लहानपणापासूनच मोलमजुरी करण्यास प्रवृत्त केले जाते. अशी मोलमजुरी करून वाढलेल्या तरुणांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळत नाही. आणि जर मिळालीच तर ती अतिशय कमी पगाराची असते. आर्थिकस्थिती खालावलेली असल्यामुळे दुसरा व्यवसाय, उद्योगधंदा करणे तरुणांना शक्य होत नाही. त्यामुळे चालकाची नोकरी किंवा स्वत:चे वाहन घेऊन व्यवसाय करणे हा मोठा प्रश्न आजच्या युवकांपुढे आहे. परंतु, अशाप्रकारे अशिक्षित व कमी शिकलेले तरुण या व्यवसायाक डे वळत आहेत. मात्र संगणकाचे ज्ञान नसल्याने त्यांना वाहन चालवण्याचा परवाना मिळत नाही. त्यामुळे त्यांचा रोजगार किंवा स्वयंरोजगाराचा मार्ग बंद होत असल्याने असे तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. (वार्ताहर)