आम्ही सारी माणसं आणि या साऱ्यांची माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 10:14 PM2021-04-27T22:14:41+5:302021-04-28T00:43:02+5:30
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी रुग्णांना वेळेवर बेड, ऑक्सिजन तसेच रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. काही रुग्णांच्या व नातलगांच्या जेवणाची परवड होते. ही गरज ओळखून सेवाभावी कार्यकर्त्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन ही उणीव भरून काढली आहे. जो तो आपल्या परीने योगदान देत असल्याने माणुसकी अद्याप जिवंत असल्याची अनुभूती येत आहे.
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी रुग्णांना वेळेवर बेड, ऑक्सिजन तसेच रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. काही रुग्णांच्या व नातलगांच्या जेवणाची परवड होते. ही गरज ओळखून सेवाभावी कार्यकर्त्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन ही उणीव भरून काढली आहे. जो तो आपल्या परीने योगदान देत असल्याने माणुसकी अद्याप जिवंत असल्याची अनुभूती येत आहे.
शशिकांत बागुल : कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांना नास्त्यासह दोन वेळेचे डबे पुरवितात.
मानूर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना नास्ता, सकाळ -संध्याकाळी जेवणाचे डबे देऊन संकटकाळात मदतीचा धावून जात आहेत. स्वतःच्या खासगी वाहनाने थेट कोविड सेंटरला जाऊन कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम करतात. गोरगरिबांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या गोरगरीब रुग्णांना नेहमीच रात्रंदिवस मदतीसाठी ते तत्पर असतात.
स्वप्निल शेलार : कोरोना रुग्णांसाठी दोन वेळेचा नास्ता तसेच रुग्णांच्या तपासणी व उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
त्र्यंबकेश्वर येथील सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष म्हणून शेलार यांनी मागील वर्षापासून आजपर्यंत कोरोनाच्या संकटात गोरगरीब लोकांची उपासमार टाळण्यासाठी अन्नछत्र उभारले आहे. बाधित रुग्णांसाठी सकाळी नऊ वाजता चहा, दहा वाजता नास्ता तसेच सकाळी व संध्याकाळी अंडी अशी व्यवस्था केली आहे. रुग्णांना नाशिक येथे तपासणी अथवा उपचारार्थ नेण्यासाठी २४ तास मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ११० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
गोकुळ गिते : गोदाकाठ परिसरातील रुग्णांना स्वत:च्या वाहनाने रुग्णालयात नेण्यापासून तर कोणाला बेड व औषधे उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतात.
गोदाकाठ भागातील नागरिकांना वेळेवर ॲम्ब्युलन्स मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, नाशिक शहरात हॉस्पिटलला बेड भेटत नाही, रुग्णांना जेवण मिळत नाही अशा अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. अशा प्रसंगात गोदाकाठ भागातील सामाजिक कार्यकर्ते गोकुळ गिते कोरोनायोद्धे म्हणून पुढे येऊन सामाजिकदायित्व म्हणून कार्य करत आहे. अनेक रुग्ण घरीच उपचार घेतात अशा रुग्णांची अचानक तब्बेत बिघडते. त्यावेळी त्यांना नाशिक किंवा निफाड, पिंपळगाव शहरातील हॉस्पिटलला दाखल करावे लागते. गावात गाडी मिळत नाही व वेळेत रुग्णवाहिकाही येत नाही तसेच कोरोना संसर्गामुळे कोणी गाडी देत नाही, अशावेळी गिते स्वतःच्या गाडीत रुग्णांना घेऊन जातात. गाडीत सलाइनही सुरूच असते. अनेक रुग्णांना शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देतात. ऑक्सिजन सिलिंडर, जेवण आणि औषधे मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आपणदेखील समाजासाठी काहीतरी करावे या प्रेरणेतून ते हे काम करीत आहेत.
किशोर फलटणकर : इगतपुरीत कोरोनाकाळात रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाइकांच्या जेवणाची सोय जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून फलटणकर व त्यांचे कार्यकर्ते रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची काळजी घेत आहेत. आतापर्यंत रोज ८० ते १०० व्यक्तींना रोजच वेगवेगळे पदार्थ तयार करून त्यांच्या जेवणाची सोय ते करीत आहेत. या आदर्श उपक्रमाबद्दल तालुक्यातील सामाजिक संस्था तसेच तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ऑक्सिजन सिलिंडरचेदेखील वाटप केले आहे.