हम सब भारतीय हैं...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 04:25 PM2019-11-06T16:25:37+5:302019-11-06T16:32:23+5:30
‘आम्ही भारतीय या नात्याने संविधानाच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचा सन्मान करत परिसरातदेखील त्याविषयीचे प्रबोधन करू’
नाशिक : सर्वोच्चन्यायालयाकडून या आठवड्यात अयोध्यातील वादग्रस्त जागेसंदर्भात निकाल येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता समिती सदस्य व प्रमुख धर्मगुरूंच्या संयुक्त बैठकीत उपस्थितांनी ‘आम्ही भारतीय या नात्याने संविधानाच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचा सन्मान करत परिसरातदेखील त्याविषयीचे प्रबोधन करू’ असा निर्धार बोलून दाखविला.
शहरात कायदासुव्यवस्था अबाधीत रहावी, यासाठी अयोध्याच्या जागेच्या निकालाचा पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी (दि.६) बैठक बोलविली. या बैठकीला विविध आखाडे, मशिदी, दर्गांचे विश्वस्त, मुजावर, मौलवी, महंतांसह शहरस्तरावरील आयुक्तालय शांतता समिती सदस्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी विविध सुचना व्यक्त करताना काही सदस्यांनी सोशलमिडियावर तसेच काही समाजकंटकांवर लक्ष ठेवावे तसेच कोणीही फटाके फोडणार नाही, याबाबत दक्षता घेतली जावी असे सांगितले. दरम्यान, नांगरे पाटील यांनी नाशिकच्या ऐतिहासिक सांस्कृतिक व धार्मिक पंरंपरेचा दाखला देत या शांतताप्रिय शहराचे नावलौकिक टिकवून ठेवावे, असे आवाहन केले. यावेळी मंचावर उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, विजय खरात उपस्थित होते. बैठकीला सभागृहात दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री महाराज, महंत भक्तीचरणदास महराज, बडी दर्गाचे विश्वस्त हाजी सय्यद वसीम पिरजादा, रजा अकादमीचे एजाज रजा मकरानी, नायब काजी एजाज सय्यद, रामसिंग बावरी, अशोक पंजाबी, शंकर बर्वे, मधुकर भालेराव, देवदत्त जोशी, हाजी जाकीर अन्सारी, बाबा खतीब, योगेश भगत, भीमानंद कारे आदि उपस्थित होते.