शाळेला आलो आम्ही
By admin | Published: June 15, 2015 11:33 PM2015-06-15T23:33:12+5:302015-06-15T23:48:26+5:30
शाळेला आलो आम्ही
!पहिला दिवस : विद्यार्थ्यांचे धूमधडाक्यात स्वागत; मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटपनाशिक : ज्यासाठी गेल्या आठवड्यापासून घरोघरी लगबग सुरू होती, त्या शाळेची दोन महिन्यांच्या सुटीनंतर पहिली घंटा आज झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुजनांनी विद्यार्थ्यांच्या हाती फुगे, गुलाबपुष्प, पेढे, चॉकलेट्स देत जंगी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले.
उन्हाळ्याची सुटी संपल्यानंतर आज नियमित शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू होण्याचे वेध लागताच घरोघरी मुलांच्या शाळेची तयारी सुरू झाली होती. शालोपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून मेनरोड गजबजून गेला होता. काल रविवारी पालकांनी या तयारीवर अखेरचा हात फिरवला. आज सकाळी नवी दप्तरे खांद्यावर टाकत, नवा गणवेश परिधान करून विद्यार्थ्यांनी उत्साहाने शाळा गाठली. डबा, वॉटरबॅग सांभाळत शाळेकडे येणाऱ्या अनेक बालकांचे चेहरे भेदरलेले, रडवेले दिसत होते, तर कोणी एकमेकांशी मस्ती करीत शाळेत येत होते.
मुलांना शाळेत सोडवण्यासाठी पालकही मोठ्या उत्साहाने आले होते. त्यामुळे बहुतांश शाळांची आवारे गजबजून गेली होती. शाळेत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षिकांनी ओवाळले. त्यांना गुलाबाचे फूल, खाऊ देण्यात आला. चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. त्या-त्या प्रभागातील नगरसेवक व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. वर्गात मुलांना छान बडबडगीते ऐकवण्यात आली, तसेच कथाही सांगण्यात आल्या. (प्रतिनिधी)