नांदगाव नको, नाशिकच हवे आम्हाला...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:06+5:302021-07-07T04:16:06+5:30
नांदगाव : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे घरून काम करण्याची सवलत मिळाल्याने दररोज नाशिक व अन्य ठिकाणाहून नोकरीनिमित्त येणाऱ्यांची सोय झाली. ...
नांदगाव : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे घरून काम करण्याची सवलत मिळाल्याने दररोज नाशिक व अन्य ठिकाणाहून नोकरीनिमित्त येणाऱ्यांची सोय झाली. मात्र ही सवय अंगवळणी पडल्याने व घरी राहून काम करण्याचे फायदे दिसत असल्याने आपली बदली नाशिक येथेच व्हावी यासाठी अनेक जण सध्या धडपड करत असल्याचे चित्र आहे.
वर्षानुवर्षे नोकरीच्या ठिकाणी वास्तव्यास न राहता अपडाऊन करून घर भाडे भत्ता खिशात घालण्याच्या प्रवृत्तीला कोरोना काळ अधिक आर्थिक प्राप्ती करून देणारा ठरला. आधी प्रवासाचा व प्रवासातल्या चहापाण्याचा खर्च होता. घरून काम करण्याच्या सवलतीमुळे तोही वाचला. कोरोना काळात मुख्याध्यापक पदाची जबाबदारी पार पाडताना नेहमीप्रमाणे काम करू शकत नाही, म्हणून सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत उपासनी यांनी आठ महिने पगार घेतला नाही. असे उदाहरण घर भाडे भत्त्याबद्दल घडल्याचे ऐकिवात नाही.
येथील शासकीय कार्यालये, खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळा, महाविद्यालये व इतर कामांसाठी सुमारे ४०० ते ५०० च्या संख्येने अपडाऊन करणारे कोरोना काळापूर्वी क्रियाशील होते. रेल्वेने येणे जाणे, आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याने सर्व आनंदी होते. परंतु कोरोना काळात घरात बसून नोकरी करण्याची सवय एवढी रुजली की, अपडाऊन करणेसुद्धा त्रासाचे व्हायला लागले. अनेक आस्थापनांमध्ये नांदगाव नको नाशिकच हवे अशी मागणी जोरात आहे. कोरोना काळात रेल्वेच्या प्रवासी गाड्या बंद असल्याने जाणे अगदी आवश्यक असले तर वर्गणी करून समूहाने एकाच खासगी गाडीने येण्याची प्रथा पडली.
नाशिक येथे बदली व्हावी अशी मागणी मान्य करण्यात आली नाही म्हणून येथील पदाधिकारी वाईट झाले. आडमुठेपणा करून नियमानुसारच काम करणार अशी भूमिका घेतली गेली. त्यात कामाचे तीन तेरा वाजले तरी पर्वा नाही... येथपर्यंत प्रकरणे हातघाईला आली.
इन्फो
ऑनलाइनचे फायदे-तोटे
ऑनलाईनमुळे गेल्या दीड वर्षात अनेक तोटे झाले. त्याबरोबर शैक्षणिक नुकसानीचा अंदाज बांधणेदेखील कठीण झाले आहे. जी स्थिती नाशिकहून अपडाऊन करणाऱ्यांची आहे तीच तालुक्याच्या ठिकाणावरून खेड्यातील कामांवर जाणाऱ्या वर्गाची झाली आहे. कोरोनाचा क्रियाशील काळ आणि कोरोनाला निरोप देण्याचा काळ यातला बदल्यांचा संघर्ष पृष्ठभागावर दिसून येत नसला तरी त्याने नोकरी करणाऱ्यांची मानसिकता आणि जीवनातल्या काही गोष्टीवर परिणाम नक्कीच केला असल्याचे चित्र आहे.