‘त्या’ आंतरराज्यीय टोळीकडून २२ तोळे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 07:17 PM2020-02-06T19:17:27+5:302020-02-06T19:20:52+5:30
१० गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. या टोळीने सुरतच्या एका सोनाराला विक्री केलेले २२ तोळे सोने १८० ग्रॅम चांदी जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.
नाशिक : भरदिवसा बंद घरांवर दरोडे टाकणारी सुरत येथील आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांची टोळी काही दिवसांपुर्वी गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने जेरबंद केली होती. त्या टोळीकडून शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सुमारे १० गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. या टोळीने सुरतच्या एका सोनाराला विक्री केलेले २२ तोळे सोने १८० ग्रॅम चांदी जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.
देशी बनावटीच्या पिस्तूलचा धाक दाखवत दरोडे टाकणारी सुरत, उत्तरप्रदेशमधील चार संशयित गुन्हेगार गुन्हे शाखेचे सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी यांच्या पथकाने रात्रीच्या गस्तीदरम्यान ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून विविध गुन्हे उघडकीस आले. संशयित रियासतअली मन्सुरी (रा.चांदपूर, जि.बिजनौर, उप्र), सिकंदरखान छोटूखान पठाण, रा.जहांगीरपूरा, राधेर सुरत), अरबाज रफिकअहमद शेख, अझहर सरफराज शेख (दोघे रा. (रा.शिवालाकला, बिजनौर) हे चौघेही अट्टल घरफोडे असून त्यांचा एक सलमान शेख नावाचा साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. त्याचाही पोलीस शोध घेत आहे. ही टोळी गावठी पिस्तुल, दोन जीवंत काडतुसांसह दरोडा टाकण्याची पुर्व तयारी करताना पोलिसांना आढळून आले होते. त्यांनी तशी क बुलीही पोलिसांना दिली. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी बलराम पालकर यांनी पोलीस कोठडीत त्यांची कसून चौकशी करत सखोल विचारपूस केली असता त्यांनी टोळीने शहरातील मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत ४, इंदिरानगर हद्दीत ३, सरकारवाडा, उपनगर, गंगापूर या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी १ असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहे. या आंतरराज्यीय टोळीतील सगळे संशयित गुन्हेगार हे सराईत असून त्यांच्याकडून अधिक घरफोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत वर्तविली.
हॉटेलच्या खोलीत वास्तव्य
शहरातील लॉज, हॉटेलच्या खोल्यांमध्ये बेकायदेशीरपणे परराज्यातील संशयित गुन्हेगार आश्रयास येत असल्याचे समोर आले आहे. घरफोड्या, दरोडे टाकणारी ही पाच गुन्हेगारांची टोळीनेही नाशिकरोडच्या एका हॉटेलमध्ये आश्रय घेतला होता. मात्र त्या हॉटेलचालक, मालकासह कोणालाही त्यांच्या हालचालींवर संशय आला नाही. पोलिसांनी ते राहत असलेल्या खोलीतून घरफोडीतील सोन्याचांदीचे दागिणे, मोबाईल असा एकूण ६२ हजार ६७२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.