आम्ही चाललो प्रकाशात..
By admin | Published: January 2, 2016 11:14 PM2016-01-02T23:14:08+5:302016-01-02T23:18:12+5:30
मनमाड : शहरातील विविध चर्चमध्ये मध्यरात्रीची भक्ती
मनमाड : शहरात नाताळचा सण उत्साहात सुरू असून, गुरुवारी रात्री शहरातील विविध चर्चमध्ये नूतन वर्ष भक्ती संदेशासह गीता कार्यक्रमांतर्गत आयोजित मध्यरात्रीच्या भक्तीमध्ये असंख्य ख्रिस्ती बांधवांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून आम्ही चाललो प्रकाशात..प्रकाशात... गीताच्या तालावर नवीन वर्षाचे स्वागत केले. सरत्या वर्षातील दुष्कृत्यांचा नाश करण्याच्या हेतूने शेकोटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नाताळ सणानिमित्त शहरातील विविध चर्च परिसरात आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री संत बार्णबा चर्च, बेथेल चर्च, सेव्हथ-डे अॅडव्होटिस्ट चर्च आदि विविध चर्चमध्ये ‘मध्यरात्रीची भक्ती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास कॅँडल कार्यक्रमात बांधवांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून नववर्षाचे स्वागत केले. या वेळी सर्वांनी ‘आम्ही चाललो प्रकाशात’ या गीताचे सामूहिक गायन केले. चर्चच्या आवारात पेटविण्यात आलेल्या शेकोट्या भोवती भक्तिगीतांचे गायन करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने शहर दणाणून गेले होते. ख्रिश्चन बांधव, आबाल वृद्ध, माहिला मोठ्या संख्येने नवे कपडे परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले होते. सर्व बांधवांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
कॅम्प भागात दरवर्षीप्रमाणे भव्य स्टार उभारण्यात आला आहे. नाताळ व नवर्षानिमित्त बार्णबा चर्चच्या वतीने पूर्वसंध्या बप्तीसे, निराधार विधवांना साडी वाटप, संदेश भक्ती, पवित्र सहभागीता, कॅण्डल सर्विस आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी रेव्ह. आर. पी. घुले यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक पाटोळे, शॅमुवेल कुबेरजी,
अतुल सूर्यवंशी, पोस्टेरेट कमिटी सचिव दिलीप सूर्यवंशी, स्मिता अडांगळे, प्रवीण निकम
आदि सदस्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)