मालेगावसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करू : राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:53 PM2020-04-29T22:53:54+5:302020-04-29T23:29:40+5:30

मालेगाव : कोरोना विषाणूचे थैमान रोखण्यासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मालेगाव शहरातील रुग्णांची वाढती संख्या चिंंताजनक असून, यासाठी मालेगावातील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सुविधेसह नागरिकांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.

 We will appoint expert doctors for Malegaon: Rajesh Tope | मालेगावसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करू : राजेश टोपे

मालेगावसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करू : राजेश टोपे

googlenewsNext

मालेगाव : कोरोना विषाणूचे थैमान रोखण्यासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मालेगाव शहरातील रुग्णांची वाढती संख्या चिंंताजनक असून, यासाठी मालेगावातील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सुविधेसह नागरिकांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी
व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा
भुसे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, महापौर ताहेरा शेख, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. आरती सिंंह, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ. पंकज आशिया, आरोग्य उपसंचालक पठाण शेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, माजी आमदार आसिफ शेख, माजी महापौर रशीद शेख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी टोपे म्हणाले, इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाइनसाठी आवश्यक सोयीसुविधांमध्ये स्वच्छ पाणी व पोषक आहार, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम व त्यांच्यासाठी लागणाऱ्या पीपीई किट व पुरेसा औषधसाठा या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यात येईल. नाशिकमध्ये तपासणी लॅब कार्यान्वित झाल्यामुळे दररोज २०० चाचण्या करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यापुढे २४ तासात अहवाल प्राप्त होणार असल्यामुळे रुग्णांवर तत्काळ उपचार मिळतील, परिणामी रुग्णांची घरवापसी मोठ्या प्रमाणात होऊ शकेल.
-----------
क्लिनिक सुरू करणार
नॉन कोविड रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगत मंत्री टोपे म्हणाले, येत्या दोन दिवसात फिवर क्लिनिक सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर सामान्य रुग्णालय नॉन कोविड करण्यात आले असून, आज तेथील परिस्थितीचाही आढावा घेतला आहे. तेथे आवश्यक सुविधेसह डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफसह स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपलब्धता तत्काळ करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले. सर्व समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून, शासनामार्फत देण्यात आलेला प्रोटोकॉल व करण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे.
--------------------
खासगी रुग्णालये तात्काळ कार्यान्वित करा
मालेगाव शहरात १५० खासगी रुग्णालये आहेत. ती तात्काळ सुरू करण्याचे आवाहन करताना मंत्री टोपे म्हणाले, रुग्ण डॉक्टरांमध्ये परमेश्वर शोधत असताना डॉक्टरांनी रुग्णालय बंद करून घरात बसणे उचित नाही. रुग्णांची हेळसांड होणार नाही यासाठी सर्व खासगी डॉक्टरांनी त्यांच्या ओपीडी तात्काळ कार्यान्वित कराव्यात. तसेच शहरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात थोडेफार लक्षणे दिसणाºया रुग्णांसाठी सोय उपलब्ध करून त्यांना पीपीई किट पुरविण्यात येतील.
-------------
लॉकडाउनची अंमलबजावणी प्रभावीपणे करा
लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत असल्याचे सांगत राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, आज पोलीस प्रशासनातील काही पोलीस कर्मचारी कोविड विषाणूमुळे बाधित झाले आहेत. त्याचबरोबर आरोग्यसेवेचे व्रत घेतलेले काही डॉक्टरदेखील रुग्णांची सेवा करताना बाधित झाले आहेत. यांच्या कर्तव्यदक्षतेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर कोरोनाला हरविण्यासाठी वेळ लागणार नाही.
कोरोना विषाणूसारख्या महामारीला थोपविण्यासाठी नागरिकांचेदेखील सहकार्य गरजेचे असून, एकजुटीने कोरोनाला हरवू या असे भावनिक आवाहन भुसे यांनी यावेळी केले. सर्वप्रथम मालेगाव येथील जीवन हॉस्पिटल व सामान्य रुग्णालयात भेट देऊन तेथील डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफशी मंत्री टोपे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचे कामही त्यांनी यावेळी केले.
शासकीय विश्रामगृहात उपस्थित सर्व अधिकारी व पदाधिका-यांशी संवाद साधून सर्वांच्या समस्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाणून घेतल्या. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येऊन प्रभावी उपाययोजना शासन स्तरावरून राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Web Title:  We will appoint expert doctors for Malegaon: Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक