२८५ लोकांची शस्रे जप्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:44 AM2019-09-26T01:44:37+5:302019-09-26T01:45:06+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार शहरातील सुमारे २८५ परवानाधारक शस्रे जप्त करण्यात येणार आहेत. शहरात एकूण १ हजार २५० व्यक्तींकडे परवाना असलेली शस्रे असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार शहरातील सुमारे २८५ परवानाधारक शस्रे जप्त करण्यात येणार आहेत. शहरात एकूण १ हजार २५० व्यक्तींकडे परवाना असलेली शस्रे असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असून, पोलीस प्रशासनाने लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. शहरात कोठेही कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या यादीवरील सराईत गुन्हेगारांची चाचपणी केली जात आहे. आतापर्यंत उपद्रवी संशयित एक हजारांपेक्षा अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सराईत गुन्हेगारांपैकी ९३ गुन्हेगारांना शहरास जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. ९ संशयितांवर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून तर थेट निकालाच्या दिवसापर्यंतची शहरातील सर्व मतदान केंद्रे, पाच स्ट्रॉँग रूम, संवेदनशील मतदान केंद्रे, प्रचार फेऱ्या, प्रचार सभा याबाबत चोख बंदोबस्त व सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार असल्याचे नांगरे पाटील म्हणाले.
निवडणूक काळात कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तूर्तास २८५ परवानाधारक व्यक्तींची शस्रे जप्त करण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्या निर्देशानुसार शस्रे जप्तीची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. गरज वाटल्यास उर्वरित एक हजार लोकांमधूनदेखील शस्रे जप्त केली जाऊ शकतात. बेकायदेशीरपणे शस्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
२०१४च्या निवडणुकीत आठ गुन्हे दाखल
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत हाणामारी, आचारसंहिता भंग, निवडणूक रिंगणातील उमदेवारांचा अवमान आदी कारणांवरून पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये जवळपास सर्वच संशयित राजकीय पक्षांशी संबंधित होते. निवडणूक काळात कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग खपवून घेतला जाणार नसून जिल्हाधिकाºयांनीदेखील तसे निर्देश दिले आहेत.