रस्त्यावर शस्त्रांनी केक कापणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 01:55 AM2021-10-14T01:55:57+5:302021-10-14T01:57:33+5:30
कोयते, तलवारींनी केक कापत आजुबाजुच्या परिसरात स्वत:चे ‘वजन’ वाढिवण्याची गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची एक फॅशन बनत चालली आहे. गुप्त माहितीच्याअधारे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अशाच प्रवृत्तीच्या तिघांना गंजमाळ येथील श्रमिकनगरमधील एका गाळ्यातून अटक केली. एक दोन नव्हे तर चक्क चार तलवारींच्या साहाय्याने केक कटिंग अन् बर्थ-डे सेलिब्रेशन केले जात असताना पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
नाशिक : कोयते, तलवारींनी केक कापत आजुबाजुच्या परिसरात स्वत:चे ‘वजन’ वाढिवण्याची गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची एक फॅशन बनत चालली आहे. गुप्त माहितीच्याअधारे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अशाच प्रवृत्तीच्या तिघांना गंजमाळ येथील श्रमिकनगरमधील एका गाळ्यातून अटक केली. एक दोन नव्हे तर चक्क चार तलवारींच्या साहाय्याने केक कटिंग अन् बर्थ-डे सेलिब्रेशन केले जात असताना पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
गुन्हे शाखेच्या युनिट-१चे पोलीस अंमलदार विशाल देवरे यांना गोपनीय माहिती मिळाली. तीन व्यक्ती श्रमिकनगर भागातील एका गाळ्यात तलवारींनी केक कापणार आहेत. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांना कळविली. त्यांनी तत्काळ पथक तयार करून सापळा रचण्याचे आदेश दिले. पथक श्रमिकनगर येथील गीतगुंजन सोसायटीच्या दिशेने रवाना झाले. यावेळी तिघे संशयित नाझीम बाबर खान (२५), आसिफ रऊफ शेख (२४, रा. वडाळारोड), सूरज सीताराम शेवरे (२४) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे तिघे संशयित विनापरवाना चार तलवारी बेकायदेशीररित्या स्वत:जवळ बाळगून वाढदिवसानिमित्त केक कापण्यासाठी आणून फोटोसेशन केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी तीन हजार रुपये किमतीच्या चार तलवारी जप्त केल्या आहेत. त्यांच्यावर हत्यारबंदी कायद्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.