डबल मास्क घाला; कोरोना टाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:22 AM2021-05-05T04:22:49+5:302021-05-05T04:22:49+5:30
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आता सिंगल मास्क नव्हे तर डबल मास्क लावल्यासच कोरोनापासून बचावाची शक्यता असल्याचे ...
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आता सिंगल मास्क नव्हे तर डबल मास्क लावल्यासच कोरोनापासून बचावाची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषत्वे कामकाजाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक नागरिकानेच डबल मास्क घालावा, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोना विषाणूच्या घातकतेत दुसऱ्या लाटेपासून सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रसार हा हवेद्वारे होत आहे, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मेडिकल जर्नलच्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानंतर सर्वांनी दोन मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दोन मास्क घातल्याने तुम्हाला कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे घरात असताना सिंगल मास्क चालू शकेल. मात्र, ज्या क्षणी कुणीही सामान्य नागरिक घराबाहेर पडेल, त्याने डबल मास्कच वापरावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने वापरत असलेला डबल मास्क तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित आहे की नाही याची सदैव काळजी घ्यायला हवी. जर तो योग्यरित्या बसत नसेल तर कोरोनाचे विषाणू शरीरात शिरकाव करु शकतात, त्यामुळे ते धोकादायक ठरते. दोन मास्क घातल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव होऊ शकतो.
इन्फो
डबल मास्क वापराची पद्धत
योग्यरित्या डबल मास्क लावण्याची पद्धत तज्ज्ञांकडून सांगितली जात आहे . त्यानुसार कपड्यांच्या मास्कसह सर्जिकल मास्क वापरा. जर तुम्ही कपड्याच्या मास्कसोबत सर्जिकल मास्क वापरलात तर तो फार प्रभावी ठरतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होते.
त्यामुळे प्रथम सर्जिकल मास्क घाला. त्यावर कपड्याचा मास्क वापरा. त्यामुळे सर्जिकल मास्क ड्रॉप्लेट इन्फेक्शनपासून बचाव करतो. तर कपड्याचा मास्क व्यवस्थित फिट ठेवण्यास मदत करतो.
इन्फो
कटाक्षाने करावा वापर
कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी, किंबहुना दोन-तीन माणसांपेक्षा अधिक व्यक्ती असतील अशा कोणत्याही ठिकाणी दोन मास्कचा वापर करणे अत्यावश्यक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी दोन मास्कचा वापर कटाक्षाने करावा. मात्र, सहा वर्षाखालील मुलांना डबल मास्क वापरला जाऊ नये, अशा सूचनादेखील तज्ज्ञांनी दिल्या आहेत.
कोट
कोरोनाची दुसरी लाट प्रचंड घातक असल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी डबल मास्क हाच सर्वोत्तम पर्याय आहे. घराबाहेर डबल मास्क लावल्याने कोरोनापासून वाचण्याच्या शक्यतेतही दुप्पट वाढ होत असल्याने डबल मा्स्क वापरण्यास प्रत्येक नागरिकाने प्राधान्य द्यावे.
डॉ. विक्रांत जाधव