पहिनेला अपघातात तरस ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:06 AM2020-11-11T00:06:18+5:302020-11-11T00:07:16+5:30
रस्ते अपघातात वन्यप्राण्यांच्या मृत्युमुखी पडण्याच्या घटना सातत्याने घडतच आहे. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या पहिने-खोडाळा राज्य मार्गावर एका तरसाला अज्ञात वाहनाने पहाटेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक दिली. या धडकेत तरसाला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
नाशिक : रस्ते अपघातात वन्यप्राण्यांच्या मृत्युमुखी पडण्याच्या घटना सातत्याने घडतच आहे. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या पहिने-खोडाळा राज्य मार्गावर एका तरसाला अज्ञात वाहनाने पहाटेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक दिली. या धडकेत तरसाला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वन्यप्राण्यांचा त्र्यंबकेश्वर भागात वावर अधिक आहे. ब्रह्मगिरीची पर्वतरांगेसह जंगलाचा भाग अधिक असल्याने या परिसरात कोल्हे, तरस, बिबटे यांसारख्या वन्यप्राण्यांचा अधिवास आढळतो. अंजनेरीपासून पुढे खोडाळा रस्त्यापर्यंत वन्यप्राण्यांचा वावर आहे. दरम्यान, पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या तरसाला एका भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात पहिने-खोडाळा राज्य मार्गावर पहिने (भिलमाळ) शिवारात झाला. या अपघातात अंदाजे तीन ते चार वर्षांचा तरस जागीच मृत्युमुखी पडला. घटनेची माहिती मिळताच वनपाल सुनील झोपे, वनरक्षक शोभा वाकचौरे, मंगेश शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरसाचा मृतदेह ताब्यात घेतला. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर येथेच तरसाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले.