कुंदेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वनपाल जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 03:23 PM2019-06-03T15:23:49+5:302019-06-03T15:24:37+5:30
सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी शिवारात रविवार (दि.२) रोजी दिवसभर बिबट्याने धुमाकूळ घातला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करत बिबट्याने त्याला गंभीर जखमी केले.
सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी शिवारात रविवार (दि.२) रोजी दिवसभर बिबट्याने धुमाकूळ घातला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करत बिबट्याने त्याला गंभीर जखमी केले. दिवसभर ग्रामस्थांनी बिबट्याचा थरार अनुभवला. वनपाल अनिल साळवे असे जखमी कर्मचाºयाचे नाव असून, त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे ११ तासांच्या रेस्कू आॅपरेशननंतर सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला. कुंदेवाडी शिवारात शशिकांत गाडे यांची द्राक्षबाग असून, या बागोत लपून बसलेल्या बिबट्याच्या मागे कुत्र्यांचा झुंड लागल्याने त्याने बागेच्या कुंपनाची जाळी तोडून उद्योजक लालाशेठ चांडक यांच्या शेतातील विहिरीच्या दिशेने धाव घेतली. या विहिरीत असलेल्या इंजिनघरात बिबट्याने आश्रम घेतला. बिबट्याच्या डरकाळ्या आणि कुत्र्यांच्या भूंकण्याच्या आवाजाने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. चांडक यांच्या विहिरीच्या इंजिनघरातून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत असल्याने घाबरलेल्या ग्रामस्थांनी वनविभागास माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेवून घटनास्थळी दाखल झाले. बराच वेळ होवूनही अंगाने धष्टपुष्ट असलेला बिबट्या इंजिनघराच्या बाहेर येत नसल्याचे पाहून साळवे यांनी इंजिनघराच्या दिशेने जात आत डोकावून पाहिले. याच सुमारास बाहेर पडत असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. बºयाच वेळ त्यांच्यात झालेल्या झटापटीत साळवे यांच्या डाव्या हाताला व डोक्याला गंभीर जखम झाली. बिबट्याच्या तावडीतून सुटलेल्या साळवे यांना नगरपालिकेच्या रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानतंर खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. बिबट्याच्या लपलेल्या ठिकाणी पिंजरा लावणे अवघड असल्याने फटाक्यांचा बार करून त्यास पळवून लावण्याचा निर्णय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यानंतरही बिबट्या तेथून हालत नसल्याने अखेर वनविभागाने पिंजरा लावला. सकाळी ६ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी बिबट्याला पाहिले होते. त्यानंतर दिवसभर वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळाजवळ पिंजराही लावण्यात आला होता. दुपारी वनविभागाच्या कर्मचाºयांवर हल्ला झाल्याने वनविभागाने सावध पवित्रा घेतला जात होता. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केल्याने वनविभागाच्या कर्मचाºयांना कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. अखेर सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजºयात अलगत अडकला.