नांदूरवैद्यला महिलांची पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 08:48 PM2020-03-26T20:48:12+5:302020-03-26T23:09:23+5:30
एकीकडे संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून, येथील नागरिक कोरोनासारख्या रोगापासून वाचण्यासाठी घरातच बसून आहेत. परंतु नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे कुठलेही नियोजन न करता नवीन विहिरीच्या खोदकामास सुरु वात केली आहे. यामुळे महिलांना कोरोनाची भीती न बाळगता पायपीट करून दूरवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नांदूरवैद्य : एकीकडे संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून, येथील नागरिक कोरोनासारख्या रोगापासून वाचण्यासाठी घरातच बसून आहेत. परंतु नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे कुठलेही नियोजन न करता नवीन विहिरीच्या खोदकामास सुरु वात केली आहे. यामुळे महिलांना कोरोनाची भीती न बाळगता पायपीट करून दूरवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार देशभरात संचारबंदी लागू झाली असून, जमावबंदीदेखील लागू आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूरवैद्य येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत असल्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होऊ शकते. यासाठी नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचे नियोजन नवीन विहिरीचे खोदकाम करण्याआधी करायला पाहिजे होते. मात्र, उपाययोजना न करता नवीन विहिरीच्या खोदकामास सुरु वात केली असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
सध्याच्या परिस्थितीत दारणा नदीतून मुख्य पाइपलाइनला पाइप जोडून वापरासाठी पाणी येणार होते. परंतु त्यास विलंब होत असल्यामुळे अजून किती दिवस पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. सध्या दारणा नदीकाठच्या जागेत नवीन विहिरीचे काम सुरू असून, या कामाला बरेच दिवस लागणार असल्यामुळे ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे पायपीट करून पाणी आणण्यापासून दिलासा मिळेल तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाण्याची वेळी आणू नये, अशी मागणी जोर धरत आहे.