विवाह सोहळ्यांमुळे अर्थचक्राला पुन्हा गती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:15 AM2021-02-11T04:15:52+5:302021-02-11T04:15:52+5:30
तुलसी विवाह झाल्यानंतर लग्नमुहूर्तांना सुरुवात झाली होती. मात्र, त्या प्रारंभीच्या काळात असलेल्या कोरोनाबाबतच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय आणि लॉन्सचालकांना ...
तुलसी विवाह झाल्यानंतर लग्नमुहूर्तांना सुरुवात झाली होती. मात्र, त्या प्रारंभीच्या काळात असलेल्या कोरोनाबाबतच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय आणि लॉन्सचालकांना अवघे ३० टक्क्यांपर्यंतच बुकिंग मिळत होते. नियमांच्या बंधनामुळे पूर्ण क्षमतेने विवाहसोहळे होत नसल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली होती. नाशिक शहरात शंभरहून अधिक तर जिल्हाभरात सुमारे ३०० हून अधिक लॉन्स आहेत. ग्रामीण भागातही लॉन्समध्येच लग्न करण्यास प्राधान्य दिले जात असल्याने प्रत्येक तालुक्याच्या गावातही १५ ते २० लॉन्स आहेत. जिल्ह्यातील काेणत्याही दाट तारखेला शंभर कोटींची उलाढाल जिल्हाभरात एका दिवसात होते. एका हंगामात सुमारे ६० तारखा असतात. त्यात काहींना सर्व तारखांना तर काही १०-२० कमी तारखांना लॉन्सचे बुकिंग मिळते. दाट तारखांना तर काही वेळा सकाळ आणि सायंकाळी असे दोन्ही वेळचे बुकिंग असते, तर ऑफ सीझनला एकदा बुकिंग असले तरी खर्च भागतो. मात्र, करोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर सरकारने जमावबंदी आदेश लागू केले होते. एकमेकांशी संपर्क टाळणे आवश्यक असल्याने सार्वजनिकरीत्या होणाऱ्या विवाहांवर बंधन टाकले होते. त्यामुळे अनेक विवाहसोहळे पुढे ढकलले गेले होते. अनेकांनी ते घरच्या घरी एका दिवसात साधेपणाने ते उरकून घेतले होते. अन्य सर्वच अर्थव्यवस्था रुळावर येत असताना विवाहाचे सोहळेदेखील पूर्वीच्या जोमाने होऊ लागल्याने हळूहळू या व्यवसायावरील मळभ दूर होऊ लागले आहे. यंदा फेब्रुवारीत अवघे दोन, तर एप्रिलमध्ये सात मुहूर्त आहेत. तर मे महिन्यात सर्वाधिक १५ तारखा असून, जूनमध्ये सात, तर जुलैमध्ये चार मुहूर्त आहेत. त्यामुळे गत वर्षी हुकलेले मुहूर्त यंदा तरी पदरात पाडून घेता येणार असल्याने लॉन्सचालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या आणि निगडित असलेल्या अनेक लहान-मोठ्या व्यवसायांनादेखील उर्जितावस्था मिळू शकणार आहे.