बुधवारपासून पहायला मिळणार अधिकमासाची धामधूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:29 AM2018-05-15T01:29:19+5:302018-05-15T01:29:19+5:30
दर तीन वर्षांनी ३१ महिने व १६ दिवसांनी येणारा अधिकमास अर्थात धोंड्याचा महिना बुधवारपासून (दि.१६) सुरू होणार असून, त्या पार्श्वभूमीवर घरोघरी, बाजारपेठेत लगबग पहायला मिळते आहे.
नाशिक : दर तीन वर्षांनी ३१ महिने व १६ दिवसांनी येणारा अधिकमास अर्थात धोंड्याचा महिना बुधवारपासून (दि.१६) सुरू होणार असून, त्या पार्श्वभूमीवर घरोघरी, बाजारपेठेत लगबग पहायला मिळते आहे. सासरी असणाऱ्या लेक-जावयास बोलावून त्यांना अनारसे, बत्तासे, आंबे, इच्छेनुसार पैसे, सोने-चांदी, तांब्या-पितळाची भांडी, कपडे, उपकरणे आदी देऊन अधिकमासाचे पुण्य मिळवण्यावर भर दिला जातो. यामुळे तुळशीच्या लग्नानंतर सुरू झालेली लग्नसराई संपताच नव्या जावयांबरोबरच जुन्या जावयांनाही गमतीने ‘अच्छे दिवस’ येणार असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी (दि.१५) अमावस्या संपल्यानंतर अधिकमास सुरू होणार आहे. नोकरी धंद्यासह आपापल्या व्यापात मग्न असणाºया जावयांना आता सासूरवाडीच्या निमंत्रणाची आस लागली आहे. सध्या उन्हाचा कडाका पहायला मिळतो आहे. शहर व ग्रामीण भागात सुट्या, प्रवास, लग्नकार्य, शेताची कामे अशा अनेक गोष्टींचा एकाचवेळी ताण पहायला मिळत आहे. त्यात आता अधिकमासाची भर पडणार आहे. हा अधिक महिना फलदायी मानला जात असल्याने या काळात तीर्थस्थळावर दीपदान, पूजा, अर्चा, ब्राह्मणपूजा, दानधर्म, धार्मिक उपक्रम यांनाही महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत अधिकमासास लागणाºया वस्तू, पदार्थांची रेलचेल पहायला मिळत आहे, तर घरोघरी लेक, जावयाला, भाच्यांना काय भेट द्यायची यावर चर्चा ऐकायला मिळत आहे. सोने-चांदीच्या वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट््स याबरोबरच गृहोपयोगी वस्तू देण्याचेही नियोजन करताना दिसत आहे. याशिवाय अधिकमासात लेक जावयाला, त्याच्या कुटुंबीयांना बोलावून गोडाधोडाचे जेवणही दिले जाते.
अधिकमास म्हणजे काय?
ऋतू सौरमासाप्रमाणे ठरलेले असतात. चांद्रवर्षाचे ३५४, तर सौरवर्षाचे ३६५ दिवस असतात. म्हणजे या दोन वर्षांमध्ये ११ दिवसांचे अंतर असते. हे अंतर भरून यावे तसेच चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा मेळ बसावा म्हणून एक महिना अधिक धरावा, असे सांगितले जाते. याला पुरुषोत्तम मास, मलमास असेही म्हटले जाते. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती केल्यास इच्छित फळ प्राप्त होत असल्याचीही आख्यायिका आहे. या महिन्यात हिंदू धर्म पद्धतीनुसार मुली व जावईबापूंना लक्ष्मी नारायणाचा जोडा संबोधला जातोे. जावई हा विष्णुचे प्रतीक, तर त्याची पत्नी अर्थात आपली कन्या ही लक्ष्मी समान असल्याने अधिक महिन्यात त्यांचे पूजन केले जाते. या पार्श्वभूमीवर त्यांना सन्मानपूर्वक बोलावून ३३ अनारसे दिले जातात. अनारसे नसतील, तर ३३ बत्तासे , ३३ म्हैसूरपाक वड्या, घिवर, ३३ नारळ, ३३ सुपाºया किंवा ३३ आंबे अथवा इतर कोणतेही ३३ फळे दिले तरी चालतात. चांदी किंवा तांब्याच्या ताटात दिवा लावून, कुंकू लावून हे दान लेक-जावयांना दिले जाते.