गोदावरीच्या पुरामुळे बुधवारचा बाजार ठप्प
By श्याम बागुल | Published: August 22, 2018 06:02 PM2018-08-22T18:02:20+5:302018-08-22T18:05:24+5:30
गेल्या तीन दिवसांपासून गोदावरीला पूर कायम असून, रामकुंड, म्हसोबा महाराज तसेच गौरी पटांगणाला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे गंगाघाट परिसरात आठवडे बाजारात बसण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. केवळ बोटावर मोजण्याइतके व्यावसायिकच दाटीवाटीने नारोशंकर मंदिरासमोर तसेच रामसेतू पुलावरच
नाशिक : शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून गोदावरी नदीला पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीच्या पुरामुळे दर बुधवारी भरणारा गंगाघाटावरचा आठवडे बाजार पूर्णपणे ठप्प झाला.
गेल्या तीन दिवसांपासून गोदावरीला पूर कायम असून, रामकुंड, म्हसोबा महाराज तसेच गौरी पटांगणाला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे गंगाघाट परिसरात आठवडे बाजारात बसण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. केवळ बोटावर मोजण्याइतके व्यावसायिकच दाटीवाटीने नारोशंकर मंदिरासमोर तसेच रामसेतू पुलावरच काही भाजी विक्रेत्यांनी दुकान थाटले होते. पुराच्या पाण्याने गंगाघाटावरील जुन्या भाजीबाजारातही शिरकाव केल्याने तेथील विक्रेत्यांनाही रस्त्यावर ठाण मांडावे लागले. बुधवारचा आठवडे बाजार विस्कळीत झाल्याने अंदाजे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. म्हसोबा महाराज, गौरी पटांगणावर पाण्याचे साम्राज्य असल्याने भाजीपाला व विविध व्यावसायिकांनी गणेशवाडी, आयुर्वेद महाविद्यालय, गणेशवाडी देवीमंदिरपर्यंत रस्त्यावर दुपारनंतर भाजीबाजार मांडला होता.
बुधवारी सकाळनंतर पावसाने उघडीप दिली असली तरी, रामकुंडावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे विविध धार्मिक विधी करण्यासाठी आलेल्या स्थानिक तसेच परगावच्या भाविकांना नदीकाठावरच धार्मिक विधी उरकते घ्यावे लागले. दुपारी गंगाघाटावरील दुतोंड्या मारुती मूर्तीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी लागल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर रामकुंडाशेजारी असलेले मनपा वाहनतळही पाण्याखाली गेल्याने देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना गंगाघाट परिसरात मिळेल त्या ठिकाणी दुचाकी तसेच चारचाकी वाहने उभ्या कराव्या लागल्याचे चित्र दिसून आले.