चिमुकल्यांनी भरवला आठवडा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:03 PM2020-01-16T18:03:08+5:302020-01-16T18:03:30+5:30
सिन्नर : येथील नवजीवन डे स्कूल शाळेत पूर्व-प्राथमिकच्या मुलांचा आठवडा बाजार भरविण्यात आला. शालेय आठवडे बाजारात मुलांना प्रत्यक्षात व्यवहार ज्ञान कळाले तसेच बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवावयास मिळाली.
चिमुकल्यांच्या या बाजारात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या व विविध फळांची दुकाने विद्यार्थ्यांनी थाटली होती. फळे व भाजीपाल्याची विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. विद्यार्थ्यांचा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही आनंद घेतला. पालकांनी शाळेच्या क्रियाशीलतेचे कौतुक केले. बाजारातील उत्साह व लगबग पाहून पालकांनी व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.या शालेय आठवडा बाजारात एका दिवसात मोठी उलाढाल झाली. यावेळी प्राचार्य बी. बी. पाटील, अनिता सूर्यवंशी, वृषाली लोंढे, योगिता भाटजीरे, नरेंद्र वाघ, गौरी परदेशी, सारिका भगत, छाया थोरात, सुमन अन्सारी, माधुरी बो-हाडे पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.