आठवडे सण बाजारात मोठी उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 09:25 PM2020-11-11T21:25:12+5:302020-11-12T00:44:33+5:30
वणी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली.
वणी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली.
निफाड, चांदवड, कळवण, सटाणा व दिंडोरी तालुक्यातील विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. किराणा व कापड दुकाने यातच जास्त गर्दी जाणवत होती. इतर व्यवसायामध्ये तुलनात्मक वर्दळ कमी जाणवत असली तरी त्या व्यावसायिकांचा समाधानकारक व्यवसाय झाला. भूतकाळात कोरोनाच्या महामारीमुळे अनेक महिने आठवडेबाजार बंद होता.
अनेक व्यापारी शेतकरी विविध व्यावसायिकांची मोठी आर्थिक हानी झाली होती, तर काहींचे आठवडे बाजार हे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने उपासमारीला सामोरे जावे लागले होते.
अनेक लोकांच्या उदरनिर्वाहाचा साधन असलेल्या आठवडे बाजारास गतवैभव प्राप्त झाले, त्यात मंगळवारी सण बाजाराच्या निमित्ताने सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, व्यावसायिक उलाढाल वाढल्याचे जाणवत असल्याने काही प्रमाणात कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता कमी झाल्याचा दिलासा सणबाजारामुळे मिळाला तसेच शहरातील कापड, किराणा, रांगोळी व सजावटीच्या वस्तूंची दुकाने तसेच खाद्यपदार्थ तयार करून देणाऱ्या राजस्थानी आचारी यांच्याकडेही गर्दी होत आहे.
कोरोनाचे संकट जिवावर बेतू नये, त्याचा संसर्ग होऊ नये नागरिकांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ नये हा शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन त्याचे तंतोतंत पालन करण्यासाठी प्रयत्न ग्रामपालिका स्तरावर करण्यात आला होता. दरम्यान कोरोनाचा प्रभाव व प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात आहे. त्यामुळे शासनस्तरावर नियम व सूचनांचे पालन करत आठवडेबाजार सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. वणीचा आठवडे बाजार मंगळवारी वणी - पिंपळगाव रस्त्यावर भरतो. सुमारे शंभर खेडेपाडे येथील ग्रामस्थ खरेदी-विक्रीसाठी येतात. धान्य, कपडे, पादत्राणे, किराणा, मसाले, भाजीपाला, फळे, भेळभत्ता याबरोबर इतर व्यावसायिक आपली दुकाने लावतात मोठी आर्थिक उलाढाल होते.