मालेगावसह परिसरात विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:16 AM2021-09-11T04:16:17+5:302021-09-11T04:16:17+5:30
शहरातील सटाणानाका, कॅम्प, मोसमपूल, मोतीबाग नाका, संगमेश्वर परिसरात सकाळपासूनच महिला आणि बालगोपाळांसह विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती, मोसमपुलावर ...
शहरातील सटाणानाका, कॅम्प, मोसमपूल, मोतीबाग नाका, संगमेश्वर परिसरात सकाळपासूनच महिला आणि बालगोपाळांसह विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती, मोसमपुलावर पूजेचे साहित्य आणि गणेशाच्या सजावटीसाठी साहित्य विक्रीसाठी मांडण्यात आले होते. बालगोपाळांनी सवाद्य मिरवणूक काढून आपल्या लाडक्या गणरायाला घरी नेले. काही मोठ्या मंडळांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह मनोभावे पूजा आरती करून वाहनात घेऊन जात होते. तालुक्यात ग्रामीण भागातही बालगाेपाळांनी गणरायाची अत्यंत उत्साहात स्थापना केली.
शहरात ठिकठिकाणी असलेल्या बालगोपाळांच्या मंडळांसह महापालिकेकडे नोंदणी केलेल्या मंडळांनी श्रींची मूर्ती नेऊन प्राप्रतिष्ठा केली. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अपूर्व उत्साह दिसून आला. घरगुती गणेशाच्या स्थापनेसाठी नागरिक रिक्षासह दुचाकीवर गणरायाची मूर्ती घेऊन जात होते. मालेगाव महापालिकेने शहरातील रस्त्यांची डागडुजी केल्याने काही दिवसांसाठी का होईना खड्डेमुक्त शहर असल्याचा भास झाला तर दोनच दिवसांपूर्वी महापालिकेतर्फे शहरातील गणेशकुंडाची स्वच्छता करण्यात आली. शहरात पोलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला असून, शांततेत आणि मोठ्या भक्तिभावात गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कोरोनाचे सावट आणि शासनाचे प्रतिबंध असल्याने महिनाभर आधी मूर्तीची होणारी बुकिंग यंदा फार कमी झाली तर दरवाढ झाल्याचे काही भाविकांनी सांगितले. सणासुदीच्या काळात नागरिकांना महाभाईचा सामना करावा लागत असून, त्याचा परिणाम गणेशोत्सवावरही दिसून येत आहे.