स्वागताला बुके, पिण्यासाठी बिसलरी !
By admin | Published: November 18, 2016 12:48 AM2016-11-18T00:48:41+5:302016-11-18T00:52:37+5:30
पथक आश्चर्यचकित : आश्रमशाळांच्या तपासणीतील तथ्य
नाशिक : स्वागताला फुलांचा पुष्पगुच्छ, पिण्यासाठी बिसलरीचे पाणी, नाश्त्याला काजू, बदाम पाहून आश्चर्यचकित झालेल्या महिलांच्या पथकाला आश्रमशाळांच्या संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी आणखी एक धक्का दिला तो म्हणजे पथकाकडे असलेल्या प्रश्नावलीची नक्कल प्रत दाखवून! कळवण तालुक्यातील आश्रमशाळेत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला बुधवारी आलेला हा अनुभव पाहता, संस्थाचालकांकडून आश्रमशाळा कशा चालविल्या जातात व त्यांचे आदिवासी विकास विभागाशी कसे साटेलोटे आहे, हेच यातून स्पष्ट झाले.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या आश्रमशाळा तपासणी पथकाचे शाळांच्या संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी केलेल्या आदरातिथ्याने महिलांचे पथक हुरळून गेले आहे. नाशिक जिल्ह्यातील शासकीय व खासगी अनुदानित अशा सुमारे १८० आश्रमशाळांच्या तपासणीसाठी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले ३० पथकांनी बुधवारपासून मोहीम सुरू केली. अचानक या तपासणी पथकाने आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील वास्तव जाणून घेत, मुलींशी संवाद साधावा व वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे शासनाने अपेक्षित ठेवले आहे. प्रत्यक्षात मात्र आश्रमशाळा संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी या तपासणीपूर्वीच तयारी करून ठेवल्याचे अनुभव आता पथकांना येत आहेत. कळवण तालुक्यातील एका आश्रमशाळेवर पथक धडकताच, तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन पथक प्रमुख व सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर पिण्यासाठी बिसलरीच्या बाटल्याही आणून ठेवल्या होत्या. आश्रमशाळेतील जेवणाचा दर्जा पथकाने तपासू नये म्हणून पाच वाजता म्हणजे शाळेच्या वेळेतच विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते, त्यामुळे पथकाला त्याच्या दर्जाची तपासणी करता आली नाही. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसऱ्या एका तालुक्यात मात्र पथकाला आश्रमशाळेचा शोध घेण्यासाठी धावाधाव करावी लागली. दुर्गम भागातही आश्रमशाळा असल्याने तेथे सुविधांची वानवाच आढळून आली.